छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालय मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. दाटीवाटी हा शब्द सामान्यतः गर्दी किंवा लोकांचा संकोच असलेल्या ठिकाणासाठी वापरला जातो. गेल्या काही वर्षांत घाटीची अवस्था अशीच काहीशी झाली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून घाटीची दाटीवाटी दूर होते का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
५० वर्षे जुनी इमारत, ५ वर्षांनंतर काय?घाटी रुग्णालयात १,१७७ खाटा आहेत. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक रुग्ण दाखल असतात. त्यामुळे जमिनीवर गादी टाकूनही रुग्णांवर उपचार करावे लागतात. रुग्णालयाचा मुख्य कणा असलेल्या सर्जिकल इमारतीला ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. ही इमारत आगामी ५ वर्षे वापरता येईल, असे स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर आले आहे. त्यामुळे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी १५०० ते १८०० खाटांच्या नव्या सर्जिकल इमारतीचा प्रस्ताव तयार केला आहे. याच इमारतीत ओपीडी राहील, असे नियोजन केले आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्याकडे लक्ष लागले आहे.
१४ वर्षांपासून फिजिओथेरपी काॅलेज कागदावरचघाटीतील भौतिकोपचार (फिजिओथेरपी) व व्यवसायोपचार महाविद्यालयाचा प्रस्ताव गेल्या १४ वर्षांपासून कागदावरच आहे. शासकीय दंत महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयाच्या ओपीडीदरम्यानच्या जागेत यासाठी ५ मजली इमारत प्रस्तावित आहे.
९० खाटांच्या वार्डांत २०० माता, नवजात शिशूघाटीतील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात ९० खाटांची मान्यता आहे. प्रत्यक्षात याठिकाणी रोज दोनशेवर माता आणि त्यांचे शिशू दाखल असतात. हा विभाग ४ वार्डात जणू २०० खाटांचे जिल्हा रुग्णालयच चालवित आहे. स्वतंत्र इमारतीसाठी जागा आहे. मात्र, प्रसूती विभागासाठी स्वतंत्र मिळणे स्वप्नवतच ठरत आहे.
‘कॅन्सर’ला पेट स्कॅन कधी?शासकीय कर्करोग रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना पेट स्कॅनसाठी खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. त्यासाठी १० हजार ते २० हजार रुपये मोजावे लागत आहे. कारण शासकीय कर्करोग रुग्णालयात पेट स्कॅनची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे.
‘डेंटल’चे विद्यार्थी ५० चे ६३, इमारत पडतेय अपुरीशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील विद्यार्थी संख्या चार वर्षांपूर्वी ५० वरून ६३ झाली. विद्यार्थी संख्या वाढली, पण इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे चौथा मजला बांधणे गरजेचे आहे. त्याबरोबरच घाटीची मालकी असलेल्या जागेची ‘डेंटल’ला आवश्यकता आहे. अधिष्ठाता डाॅ. माया इंदूरकर यासाठी प्रयत्नशील आहेत.