आडूळ : येथील जनावरांचा मंगळवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या सावटामुळे भरलाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर भविष्यकाळात पशुधनाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारा मराठवाड्यातील प्रसिद्ध व नावलौकिक असलेला आडूळ बु. येथील जनावरांचा आठवडी बाजार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढीस लागल्याने पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशान्वये दोन पंधरा दिवसांसाठी तालुक्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी बाजारात ना गुरांच्या हंबरण्याचा आवाज, ना गळ्यातील घुंगरांचा आवाज आला.
आडूळचा जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे बैलजोडीचे दर कडाडले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाकडून मार्च-२०२० पासून संपूर्ण देशभरात आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. मध्यतंरी काही ठिकाणी पुन्हा बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या. जनावरांचा बाजारदेखील सुरू झाले होते. मात्र, कोरोनाचे सावट पुन्हा वाढू लागल्याने शासनाकडून निर्बंध घालण्यात आले. याचा फटका आडूळ येथील जनावरांचा आठवडी बाजारालादेखील बसला आहे. घुंगरांचा आवाज, बोटांच्या हालचालीवर होणारे व्यवहार, बैलजोडीच्या खरेदी-विक्रीतून होणारे कोट्यवधींचे व्यवहार मंगळवारी ठप्प झाले आहेत.
मराठवाड्यातील सर्वांत मोठा बैलबाजार म्हणून या बाजाराची ओळख आहे. येथील बाजारात विविध जातींचे व गटातील बैलांचा समावेश असतो. औरंगाबाद जिल्हासह लगतच्या जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांसह राज्य परराज्यातून शेतकरी व व्यापारी वर्ग आदी ठिकाणांवरून या ठिकाणी हजेरी लावतात. बैल खरेदी-विक्रीसाठी मोठ्या उलाढाल होते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने गुरांच्या या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वैभवशाली परंपरा असलेला बाजार नित्य नियमाने भरतो, पण आज पुन्हा एकदा तो सुनासुना झाला आहे.
--------------
शेतकरी म्हणाले...
शेतीच्या मशागतीसाठी बैलाची गरज असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सतत बाजार बंद असल्याने बैल मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. शिवाय बैलजोड्यांची किंमतही वाढली आहे. आगामी खरीप हंगामावर याचा परिणाम होईल. बैलजोड्यांची संख्या घटल्याने पेरणीवर परिणाम होईल.
- योगेश वाघ, शेतकरी, आडूळ
पैठण तालुक्यात अत्य अल्पभूधारकांची संख्या सर्वाधिक असल्याने शेतकऱ्यांना यंत्रांच्या साहाय्याने शेती करणे परवडत नाही. अनेक छोटे शेतकरी एका बैलावरच शेती करतात. आपला एक बैल व दुसऱ्या एकाचा बैल अशी शेती करून मशागतीसह पेरणीची कामे करून घेतात. परंतु यावर्षी जनावरांचा बाजार सतत बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.
- लालसिंग राठोड, शेतकरी, ब्राम्हणगाव तांडा