औरंगाबाद : एमजीएमच्या गंगा वसतिगृहातील आकांक्षा देशमुख खुनाच्या तपासाला सिडको पोलिसांनी वेग दिला आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विविध विद्यार्थिनींसह वसतिगृह प्रमुख, सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि तिच्या मैत्रिणींची पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर कसून चौकशी केली. या चौकशीत सर्वांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. जबाबात विसंगती असलेल्या संशयितांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, एमजीएममधील गंगा वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील रूम नंबर ३३४ मध्ये राहणाऱ्या डॉ. आकांक्षा अनिल देशमुख (रा. माजलगाव) या विद्यार्थिनीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे ११ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याविषयी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. आकांक्षा मृतावस्थेत सुमारे १५ ते १८ तास रूममध्ये पडून होती. १० डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आक ांक्षाला वसतिगृहातील मुलींनी पाहिले होते. शिवाय ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यानंतर ती तिच्या खोलीत गेली आणि ११ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास मृतावस्थेत आढळली होती. तिच्या खोलीतील दोन पलंग जागेवरून सरकलेले होते, तर टेबल उलटा पडलेला होता. रूमध्ये मिठाची डबी, पांढऱ्या रंगाचा स्कार्प पडलेला होता.
शवविच्छेदन अहवालात आकांक्षाचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तेव्हापासून पोलिसांनी आकांक्षाच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक पूनम पाटील, उपनिरीक्षक प्रतिभा आबूज, उपनिरीक्षक सी.बी. ठुबे, उपनिरीक्षक भरत पाचोळे यांच्यासह कर्मचारी नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, निंभोरे, सुरेश भिसे, संतोष मुदिराज, इरफान खान आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभर वसतिगृहाशी संबंधित प्रत्यकाचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली.
मुलींची चौकशी महिला अधिकाऱ्यांकडूनवसतिगृहात राहणाऱ्या मुली आणि आकांक्षाच्या खोलीशेजारील मुलींची चौकशी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केली. यावेळी प्रत्येक मुलीला स्वतंत्र प्रश्न विचारून त्यांचे जबाब नोंदवून घेतले. वसतिगृहात सुमारे साडेचारशे मुली राहतात, यामुळे प्रत्येक मुलीची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. यामुळे वसतिगृहातील अनेक मुली घाबरल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय वसतिगृहप्रमख, वसतिगृह सहप्रमुखांसह महिला सफाईगार, महिला सुरक्षारक्षकांची चौकशी करण्यात आली.
आकांक्षाच्या रूमपार्टनरची चौकशीआकांक्षाच्या रूमपार्टनर असलेल्या दोन विद्यार्थिनींपैकी एक अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात तर दुसरी पॉलिटेक्निकमध्ये शिकत आहे. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे दोन्ही विद्यार्थिनी १ डिसेंबर रोजी गावी गेल्या होत्या. यापैकी एक मुलगी ९ रोजी परत येऊन दुसऱ्या दिवशी १० डिसेंबर रोजी परत गावी गेली होती. या दोन्ही मुलींची चौकशी पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी केली. यासोबत अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
खुनाचा तपास चोहोबाजूने -चिरंजीव प्रसादडॉ.आकांक्षा देशमुख यांच्या खुनाचा तपास चोहोबाजूने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आकांक्षा देशमुख हिचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले असताना तिने आत्महत्या केली, यादृष्टीने तपास क ा केला जात आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आकांक्षा देशमुख हिने आत्महत्या केली असे आमच्या एकाही पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले नाही. सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून पोलीस अधिकारी योग्य तपास करीत असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.