औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने १३ मार्च रोजी मुंबई येथे आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजन समितीचे बाळासाहेब सानप यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, राज्यात लाखो विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देत असतात. मात्र, एकूण रिक्त पदांपैकी १० टक्केच पदांसाठी परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया केली जाते. यामुळे एका पदासाठी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यात सरकारने आता कंत्राटी पद्धतीने नोकरभरती सुरूकेली आहे. यामुळे अनेक सरकारी कार्यालयांत तुटपुंज्या पगारात युवक नोकर्या करीत आहेत. वरचा मलिदा कंत्राटदार खात आहेत. सरकारने कंत्राट पद्धत बंद करावी, तसेच नोकरभरतीवरील निर्बंध हटवावेत. सरळ सेवेतील ३० टक्के कपातीचे धोरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी मुंबईत १३ मार्च रोजी आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. अॅड. राहुल तायडे यांनी सांगितले की, या राज्यातील १ लाख युवक मुंबईतील महामोर्चात सहभागी होणार आहे. यावेळी डॉ. कुणाल खरात, सचिन डोईफोडे, नीलेश आंबेवाडीकर, वैभव मिटकर व संघर्ष समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या- शिक्षकांची रिक्त २४ हजार पदे तात्काळ भरावीत.- जिल्हा परिषद, मनपाच्या शाळा बंद करूनयेत. - जि.प.जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास विभागातील जागा १०० टक्के भराव्यात. - सर्व स्पर्धा परीक्षा शुल्क १०० ते २०० रुपयांपर्यंत आकारण्यात यावे. - सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह २ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा. - भरती प्रक्रियेसंदर्भात तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रात राबवावा.