आरोग्य उपसंचालक : कोविशिल्डचे १९ हजार ५०० डोस, कोव्हॅक्सिनचे १२ हजार डोस
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून लसीच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत होते. परिणामी, लसीकरणही विस्कळीत झाले. आता औरंगाबादला कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी दिली. औरंगाबादला कोविशिल्डचे १९ हजार ५०० डोस आणि कोव्हॅक्सिनचे १२ हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे किमान काही दिवस लसीकरण सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गंत असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी कोव्हॅक्सिनचे ४४ हजार डोस मिळाले आहे. यात परभणी आणि जालन्यासाठी प्रत्येकी १२ हजार आणि हिंगोलीसाठी ८ हजार डोस मिळाले आहेत. कोविशिल्डचे जालन्याला १८ हजार ४००, हिंगोलीला २५ हजार ६०० आणि परभणीला २२ हजार डोस मिळाले आहेत. लसीअभावी गेल्या काही दिवसांपासून लसीकरण विस्कळीत झाले. नागरिकांना लसीच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकावे लागले. जिल्हा रुग्णालय, घाटी रुग्णालयात लसीसाठी एकच गर्दी उसळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ही परिस्थिती आता किमान काही दिवस थांबेल, अशी अपेक्षा आहे.
११.४८ टक्के लसीकरण
जानेवारीत लसीकरण सुरू झाले होते. गेल्या ४ महिन्यांत जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ३ लाख ७७ हजार ५६२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. ११.४८ टक्के लसीकरण झाले आहे, तर यात ६७ हजार ८२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.