लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोग स्थापन करून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी जि.प. परिषदेवर ‘आयटक’ संलग्नित अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी संघटनेतर्फे बुधवारी मोर्चा काढण्यात आला.‘आयटक’ संघटनेतर्फे केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जनजागरण मोहीम ९ आॅगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान आयोजित केली आहे. मराठा आरक्षणासाठी क्रांतिदिनी बंद पुकारण्यात आलेला असल्यामुळे या मोहिमेचा शुभारंभ औरंगाबादेत बुधवारी (दि.८) झाला. ‘आयटक’शी संलग्न असलेल्या अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी संघटनेतर्फे भाकपच्या कार्यालयापासून जि.प.वर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला जिल्हा महिला बालविकास अधिकारी बी.ए. सावंत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा पैठणगेट, औरंगपुरामार्गे जि.प.वर पोहोचला. यावेळी अंगणवाडी सेविका, आशांनी ‘संघ-भाजप हटाव’, ‘पंकजाताई आमच्या फाईल कुठे गेल्या, जबाब दो’, ‘सरकार चले जाव’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनात आयटकचे जिल्हाध्यक्ष प्रा. राम बाहेती, अॅड. अभय टाकसाळ, अनिल जावळे, तारा बनसोडे, मीरा अडसरे, माया भिवसने, विजया गठडी, शन्नो शेख, ललिता दीक्षित, रंजना राठोड, विमल खरात, शीला साठे, सुनीता गवळीकर, सुनीता शेजवळ, मुरली म्हस्के, कांता पानसरे, प्रमिला सोनवणे, सीमा व्यवहारे, सुधा जोशी, ऊर्मिला नरवडे, मंगल धत्तिंगे, ज्योती गायकवाड, कविता वाहूळ, मल्लिका वालेकर, सीमा व्यवहारे आदींची उपस्थिती होती.या आहेत मागण्याअसंघटित क्षेत्रातील कर्मचाºयांना १८ हजार रुपये वेतन द्यावे, लाईट लिस्टिंगची कामे अंगणवाडी कर्मचाºयांना देण्यात येऊ नयेत, रजिस्टर स्टेशनरी साहित्याचा पुरवठा करावा, अंगणवाडीसेविका व मदतनिसांच्या जागा त्वरित भराव्यात आदी मागण्यांचे निवेदन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना दिले.
अंगणवाडीसेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:42 AM
असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोग स्थापन करून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी जि.प. परिषदेवर ‘आयटक’ संलग्नित अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी संघटनेतर्फे बुधवारी मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देजनजागरण मोहिमेला सुरुवात : जिल्हा परिषदेचा परिसर घोषणाबाजीने दणाणला