औरंगाबाद : महाराष्ट्रात १० ते १२ जागांवर आप लोकसभानिवडणूक लढेल अशी माहिती आपचे दिल्ली सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते महार रेजिमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त शहरात आले आहेत.
ईव्हीएम मशीनमध्ये गडबड शक्य आहे. हे अनेकदा समोर आले आहे. त्याविरुद्ध आम आदमी पार्टी आवाज उठवत आहे. आपसह इतर पक्षही बॅलट पेपरने निवडणूका घेण्याची मागणी करत आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने गंभीरता दाखविली पाहिजे, ते काही एका पक्षाच्या अंतर्गत काम करीत नाही. त्यामुळे बॅलट पेपरने निवडणुका घेतल्या पाहिजेत अशी मागणी आपचे दिल्ली सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी यावेळी केली.
राजेंद्रपाल गौतम म्हणाले, आपने दिल्लीत भ्रष्टाचार नाहीसा केला आहे. देशातील इतर सरकारांनादेखील ते शक्य आहे. केंद्र सरकार सरकारी कंपन्यांना कमकुवत करून खाजगी लोकांना मजबूत करीत आहे. या तानाशाही सरकारला उखडून फेकायला आप सज्ज आहे. आगामी लोकसभेत आप महाराष्ट्रमध्ये किमान १० ते १२ जगावर लढेल , असेही राजेंद्रपाल गौतम म्हणाले. पत्रकार परिषदेस ब्रिगेडियर सुधीर सावंत उपस्थित होते.