छत्रपती संभाजीनगर : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना जिल्ह्यात महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली. जिल्ह्यात २९ दवाखाने सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाचे पहिल्या टप्प्यात १४ दवाखाने सुरू करण्याचे नियोजन होते; पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात ५ आणि मनपा हद्दीत १, असे अवघे ६ दवाखाने सुरू झाले.
ही योजना प्रामुख्याने शहरी भागातील झोपडपट्टी अथवा गरीब, कामगारबहुुल वस्त्यांमध्ये राबविण्याचा शासनाचा हेतू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा दिल्या जातात; पण शहरी भागातील गरीब नागरिक, कामगार अथवा हातावर पोट असणारे अनेक लोक आजारी असले, तरी ते मजुरीलाच प्राधान्य देतात. अशा नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने ‘आपला दवाखाना’ ही योजना सुरू केली. या ठिकाणी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागाच्या सेवा सुरू राहतील. १ मे रोजी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते राज्यात या योजनेला ऑनलाइन सुरुवात झाली.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्य विभागाने या दवाखान्याच्या नियोजनाबाबत जि.प. आरोग्य विभागाला सूचना दिल्या होत्या. एकूण २९ पैकी पहिल्या टप्प्यात १४ दवाखाने सुरू केले जाणार होते; परंतु अनेक ठिकाणी दवाखान्यांसाठी इमारती मिळाल्या नाहीत. ज्या मिळाल्या आहेत, त्यांच्या दुरुस्तीचे काम १ मेपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कन्नड येथे जुने ग्रामीण रुग्णालय, सिल्लोडमध्ये स्नेहनगर, पैठण येथे शिवाजी चौकातील सार्वजनिक वाचनालय, गंगापूर येथे पंचायत समिती परिसर, खुलताबाद येथे नगर परिषद परिसरात या पाच ठिकाणी हे दवाखाने कालपासून सुरू झाले.
या सेवा मिळणारबाह्यरुग्णसेवा (वेळ दुपारी २ ते रात्री १०), मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला, गर्भवती मातांची तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, महिन्यातून निश्चित केलेल्या दिवशी नेत्रतपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, गरजेनुसार विशेषज्ञ सेवा. याव्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्रतपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषत: संदर्भ सेवा, योगा व व्यायामाची प्रात्यक्षिकेही करण्यात येणार आहेत.