औरंगाबाद : भोंगा वादाला बाजूला सोडत शहरातील शहागंज भागात हिंदू आणि मुस्लीम समाजातील व्यापाऱ्यांनी गणपती मंदिरात आरतीसाठी एकत्र येत सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. यासोबतच, राज्यात मनसेच्या 'भोंगा हटाव, हनुमान चालीसा लगाव' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
शहागंज शहरातील जुनी व्यापार पेठ असून या भागाने अनेक दंगलींना तोंड दिले आहे. दोन्ही समाजाचे व्यापारी येथे अनेक वर्षांपासून एकत्र व्यापार करतात. मनसेने मशिदीवरील भोंग्याच्या समोर हनुमान चालीसा वाजविणार असे जाहीर केल्याने राज्यात तणावाचे वातावरण होते. मात्र, शहरात शहागंज येथील दोन्ही समाजातील व्यापाऱ्यांनी गणपतीच्या आरतीला एकत्र येत आमच्यात ऐकी आहे असे जाहीर केले.
काय म्हणाले व्यापारीसुखदुखात आम्ही कायम एकत्र आहोत. राजकीय वादाने सर्वसामान्य नागरिकांनी सर्वात जास्त त्रास होतो. जगात काहीही झाले तरी इथे दोन्ही समाज सणवार, एकमेकांच्या सुखदुखात एकत्र येतो. पहिल्यापासून सोबत आहोत, यापुढे राहू, अशा भावना यावेळी दोन्ही समाजातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.
शहरात शांतता मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मशिदीसमोर पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान, शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांचा कोणत्याही मंदिरात पूजा अर्चा करण्यास विरोध नाही. फक्त मशिदिसमोर अजानच्या वेळेस हनुमान चालीसा किंवा इतर काही करण्यास बंधन घातली आहेत, असे पोलीस आयुक्त निखील गुप्त यांनी सांगितले. तसेच कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास थेट करवाई करण्याचेही त्यांनी आदेश दिले आहेत.