छत्रपती संभाजीनगर : कुणी काही म्हटले तरी आठवणींचे पक्षी हेच पहिले दलित आत्मकथन असून, हे आत्मकथन जगण्याचे सामर्थ्य देते, असे प्रतिपादन रविवारी येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.
प्र. ई. सोनकांबळे यांच्या जयंतीनिमित्त प्र. ई. सोनकांबळे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘मराठी आत्मकथने : शोध आणि बदलते प्रवाह’ या विषयावर पीईएसच्या अशोका सभागृहात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कुमुदिनी सोनकांबळे होत्या. प्रारंभी भन्ते सत्यपाल यांनी बुद्धवंदना घेतली. पाहुण्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व प्र. ई. सोनकांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जाणकार रसिकांची मोठी गर्दी होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विषयात प्रथम आलेल्या प्रगती बेलखेडे, इंग्रजी विषयात प्रथम आलेले सुरेंद्र बहिरव यांचा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चंद्रकला बाबूराव जाधव यांचा सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी ‘प्र. ईं’च्या साहित्यावर प्रकाश टाकला. ‘आठवणींचे पक्षी’वर कांबळे यांनी एम. फील केले आहे. ते म्हणाले, १९५० ते १९७५ पर्यंत ‘मिलिंद’च्या नियतकालिकांचे अंक अभ्यासले तर महत्त्वाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व साहित्यिक दस्तावेज ठरेल. मात्र, ते आता ग्रंथालयात कुठेही आढळत नाहीत. प्रा. नवनाथ गोरे यांनी प्रास्ताविक व पंकज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चेतना सोनकांबळे यांनी आभार मानले.