संतोष हिरेमठ
औरंगाबाद : बाळाचे वजन ५ किलो २०० ग्रॅम... हो, तेवढेच वजन. कोणाला विश्वास बसणार नाही; पण घाटी रुग्णालयात कुपोषित बालकांबरोबर अधिक वजन असलेली बालकेही जन्माला येतात. हे प्रमाण तब्बल १० टक्के आहे. तुम्ही म्हणाल वजन अधिक असणे चांगले तर आहे; पण जन्मजात अधिक वजन असणे ही बाळासाठी काहीशी धोक्याची घंटा असते. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
दरवर्षी ४ मार्च हा जागतिक लठ्ठपणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाढत्या लठ्ठपणाच्या प्रश्नावर जनजागृती केली जाते.
जन्मानंतर कमी वजनाचे म्हणजे कुपोषित बालकांचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. या प्रश्नाबराेबर आता जन्मजात अधिक वजन राहणाऱ्या बालकांचा प्रश्नही उभा राहत आहे. जन्मानंतर बाळाचे वजन अडीच ते तीन किलो असेल तर एकच आनंद व्यक्त होतो; परंतु आपल्याकडे यापेक्षा अधिक वजनाचे बाळ जन्माला येते. घाटीत गेल्या वर्षभरात १४ हजार ६५३ प्रसूती झाल्या. यात १० टक्के बालकांचे वजन हे ४ किलोंपेक्षा अधिक राहिले. ५ किलो २०० ग्रॅमचे बाळही घाटीत जन्मलेले आहे. हे फक्त एकट्या घाटीतील प्रमाण आहे. जिल्ह्याचा विचार केला तर हे प्रमाण यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञ म्हणतात...
नेहमीसाठी लठ्ठपणाचा धोका
लठ्ठपणा वाढण्याचे चार वयोगट आहे. यात पहिला टप्पा हा मूल आईच्या पोटात असतानाचा आहे. जन्मानंतर साडेतीन किलोपेक्षा अधिक वजन असेल तर नेहमीसाठी लठ्ठपणाचा धोका असतो. चुकीच्या पद्धतीने आहार दिला तर अशा मुलांत लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. जन्मजात वजन जास्त असले तरी वजन नियंत्रणात ठेवणे शक्य असते. त्यासाठी पालकांनी योग्य खबरदारी घेतली पाहिजे.
-डाॅ. प्रीती फटाले, बालस्थूलतातज्ज्ञ
शहरासह ग्रामीण भागांतही वाढते प्रमाण
मुलांचे वजन जन्मत : २.५ किलोपेक्षा कमी किंवा ४ किलोंपेक्षा अधिक असेल तर अशा मुलांत अतिरिक्त चरबी वाढण्याची शक्यता अधिक असते. शहरी भागासह ग्रामीण, गरीब कुटुंबातही स्थूल मुलांचे प्रमाण दिसत आहे. लहान मुलांत वाढणारी स्थूलता ही येणाऱ्या काळासाठी धोक्याची घंटा आहे. आहार आणि व्यायाम या दोन्ही बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-डाॅ. संध्या कोंडपल्ले, सचिव, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना
...म्हणून जन्मजात स्थूल बालके
ज्या महिलांना मधुमेह आहे, थायराॅइड आहे, अशांचे बाळ ४ किलोपेक्षा जास्त असण्याची शक्यता असते. याला जन्मजात स्थूलता म्हणतात. अशा शिशूंना पुढे मधुमेह, थायराॅइड, हायपरटेंशनची शक्यता असते. त्यामुळे गरोदरपणात मधुमेह, थायराॅइड हे नियंत्रणात राहील, याकडे लक्ष देण्याची गरज असते.
-डाॅ. श्रीनिवास गडप्पा, प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी