छत्रपती संभाजीनगर : तब्बल १२८ वर्षांपूर्वी १८९५ मध्ये एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लागला. काळानुसार या क्ष-किरणशास्त्राचा वेगाने विकास झाला. हाडांचे फ्रॅक्चर शोधण्यापासून विविध आजारांचे निदान करण्यासाठी क्ष-किरणांचा वापर होतोय. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात सव्वा लाख रुग्णांचे एक्स-रे काढले जात आहे. त्यातूनच हाडांचे फ्रॅक्चर, पोटांचे आजार, छातीच्या आजारांसह अनेक आजारांचे निदान झाले.
दरवर्षी ८ नोव्हेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन’ साजरा करण्यात येतो. ‘रेडिओलॉजी’बाबत जागरूकता वाढविण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो. पूर्वी एक्स- रे काढण्यासाठी ‘डार्क रूम’चा वापर केला जात असे; परंतु, आता डार्क रूमची जागा काॅम्प्युटराइज्ड रेडिओग्राफी (सीआर) व डिजिटल रेडिओग्राफी (डीआर) या अद्ययावत प्रणालींनी घेतली आहे. परिणामी, डिजिटल रेडिओग्राफीमुळे रुग्णांना क्ष- किरणांमुळे होणारा धोका पूर्वीच्या तुलनेने खूप कमी झाला. ‘एक्स- रे’च्या सिद्धांतावर आधारित सीटीस्कॅन व मॅमोग्राफी हे अत्याधुनिक तंत्रज्ञानदेखील विकसित झाले आहे. रुग्णांसाठी रेडिओलॉजी हे निदानशास्त्र पूर्वीपेक्षा तुलनेने अधिक सुरक्षित झाले आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
घाटीतील वर्षभरात किती तपासण्या?- एक्स-रे : १.२५ लाख- सीटीस्कॅन : ४५ हजार- मेमोग्राफी दाेन हजार ५५५- एमआरआय : १४ हजार ६००- सोनोग्राफी : ९१ हजार २५०शहरात एकूण रेडिओलाॅजिस्ट - २००
अचूक निदानघाटीत वर्षभरात सव्वा लाख एक्स-रे काढण्यात येतात. त्याबरोबर सीटीस्कॅन, मेमोग्राफी, एमआरआय, सोनोग्राफीही मोठ्या प्रमाणात होतात. या तंत्रज्ञानामुळे अचूक निदान होण्यास मदत होते. आरोग्य सेवेबरोबर औद्योगिक क्षेत्रातही क्ष-किरणांचा वापर होतो.- डाॅ. वर्षा रोटे-कागिनाळकर, क्ष-किरण विभागप्रमुख, घाटी
‘एक्स-रे’चे महत्त्व कायमगेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात मोठा बदल झाला. ‘एक्स-रे’पाठोपाठ सीटीस्कॅन, एमआरआय आदी तपासण्या सुरू झाल्या. मात्र, आजही ‘एक्स-रे’चे महत्त्व कायम आहे. बेसिक ‘एक्स-रे’ काढल्यानंतर गरजेनुसार पुढील तपासण्या केल्या जातात.- डाॅ. प्रसन्न मिश्रीकोटकर, अध्यक्ष, रेडिओलाॅजी असोसिएशन
आजारांचे निदान करणे सोपेरेडिओलॉजी म्हणजेच क्ष- किरणशास्त्रामुळे मज्जासंस्थेचे आजार, फुप्फुसांचे आजार, पोटाचे आजार, यकृताचे आजार, कर्करोग, किडनी व मूत्रपिंडाचे आजार आदी आजारांचे निदान करणे अधिक सोपे झाले आहे.- डॉ. राहुल रोजेकर, रेडिओलॉजिस्ट