औरंगाबाद : पैशाच्या व्यवहारातून एका मुलाचे अपहरण केल्यानंतर आई आणि आत्याने केलेल्या धाडसाने त्याची सुखरूप सुटका झाल्याची घटना जालना रोडवर भर दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. अतुल हजारे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून तो परतूर येथील रहिवासी आहे.
याबाबत अतुलचे वडील सतीश हजारे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सतीश हजारे हे परतूर येथील रहिवासी असून त्यांनी दोन वर्षांपूर्वी काही खाजगी सावकाराकडून १ लाख ७० हजाराचे कर्ज घेतले होते. याची परतफेड त्यांनी वेळोवेळी केली. मात्र तरीही सावकार जीवे मारण्याची धमकी देत पैस्यांची मागणी करत होता. यामुळे सतीश हजारे यांनी एक भूखंड विकून त्यांना १५ लाख रुपये दिले. मात्र यावरही सावकाराचे समाधान झाले नाही, त्याने जीवे मारण्याची धमकी देत सतत पैश्यांची मागणी केली. यामुळे हजारे पत्नी आणि मुलासह पुंडलिक नगर येथे राहावयास आले.
दरम्यान, आज दुपारी त्यांचा मुलगा अतुल हा गजानन नगर येथून काही कामानिमित्त बाहेर पडला. यावेळी दबा धरून बसलेल्या चौघांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर एका चारचाकीत ( एमएच ४४ बी २८६७ ) त्याला टाकून ते जालना रोडवर आले. यावेळी त्यांनी अतुलला कार मध्ये मारहाण केली. दरम्यान अतुलने त्याच्या वडिलांना फोन करून त्याचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्याचे वडील बाहेर गावी असल्याने त्यांनी लागलीच औरंगाबाद येथे पत्नीला याची माहिती दिली. यानंतर अतुलच्या आई आणि आत्या या दोघींनी रिक्षाने लागलीच कारचा पाठलाग केला. जालना रोडवर हायकोर्ट समोर त्यांनी कारला गाठले व मुलाला एकदा बोलू देण्याची विनंती केली. कार थांबली असता अतुलच्या आत्याने कारमधील अपहरणकर्त्यांच्या गळ्याला पकडले. यात अतुलची आई आणि आत्या यांची अपहरणकर्त्यांसोबत झटापट झाली. याच दरम्यान पोलिसांची एक गाडी या मार्गावरून जात होती. पोलिसांची गाडी पाहताच अपहरणकर्त्यांनी कारसोडून तेथून पलायन केले. यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता अतुल त्याची आई व आत्या यांनी परतूर येथील खाजगी सावकाराचे हे कृत्य असल्याचे सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.