लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकाग्रहास्तव आपण पुन्हा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत असल्याचे आज येथे एका पत्रपरिषदेत सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले. पक्षाने मला मोठे केले आहे. खूप काही दिले आहे. अशा वेळी अडेलतट्टूपणाची भूमिका योग्य नाही म्हणून पुन्हा नव्या जोमाने मी कामाला लागत आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळाले नाही, अशी तक्रार सत्तार यांनी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा केली होती. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता, तेव्हापासून पवारच ही दोन्ही पदे सांभाळत होते. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ असे अभियान प्रदेश काँग्रेसने हाती घेतले. त्याचा प्रारंभ बुलडाण्यापासून झाली. या कार्यक्रमाला औरंगाबादहून आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदी गेले होते. तेथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबरोबर त्यांची चर्चा झाली आणि आज पत्रपरिषद घेऊन आपण जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारीत असल्याचे जाहीर केले. आज सत्तार यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनाही बोलावले होते. पत्रपरिषदेनंतर त्यांनी या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माझी कर्जमाफी झाली नाही अभियान फॉर्मचे वाटपही यावेळी करण्यात आले.
अध्यक्षपदाची धुरा पुन्हा अब्दुल सत्तार यांच्याकडे
By admin | Published: July 14, 2017 12:40 AM