मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून टीईटी घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. हजारो शिक्षकांना कामावरुन कमी करण्यात येणार आहे. ज्यांना नोकरी मिळालेली नाही, त्या उमेदवारांना पुन्हा कधीच टीईटी देता येणार नाही. त्यातच, शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे या टीईटी घोटाळ्याच्या यादीत दिसल्याने खळबळ उडाली आहे. त्यावरुन आता शिवसेनेतील नेतेही आक्रमक झाले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या टीईटी शिक्षकांच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आहेत. त्यावरुन, शिवसेनेच्या नेत्यांनी सत्तार यांच्यावर टीका केली असून, योग्य चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, या यादीतील नावावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देताना यादी फेक असल्याचं म्हटलंय. माझा किंवा माझ्या कुटुंबाचा याच्याशी काही संबंध नाही. जे यात दोषी असतील त्यांना फासावर लटकवा, असे सत्तार म्हणाले आहेत. दुसरीकडे औरंगाबादेतील शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा महाराष्ट्रात उघडकीस आला असून सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे त्यात आहेत, त्यांना एजंटमार्फत पैसे देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे. या प्रकरणांत त्यांची पात्रता रद्द करण्यात आली असून आता आमदार अब्दुल सत्तार यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. तसेच, सत्तार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही खैरे यांनी केली आहे.
व्हायरल नावात तफावत
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक यादी व्हायरल झाली आहे. त्यामध्ये हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन नावे आहेत. या नावांवर देखील सत्तार यांनी आक्षेप घेतला आहे. मी अब्दुल सत्तार आहे, त्यांच्या नावात पुढे शेख लावले आहे. या नावांतही तफावत असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.