औरंगाबाद: आज औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरात हिंदू गर्जना मेळावा आणि संदीपान भुमरे यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी आगामी स्थानिक निवडणुका आणि भाजपसोबतच्या युतीबाबत मोठा दावा केला.
'जनतेची साथ मिळाल्यावर...'या कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार म्हणतात की, 'मंत्रिपदं येतील-जातील, पण कार्यकर्ता हे पद जात नाही. चांगली कामे केल्यावर लोकांची साथ मिळते, त्यांची शक्ती मिळते. लोकांची साथ मिळाल्यानंतर राजकारणाच्या ट्रॅकवर अडथळे आले, तरीही गाड्या सरळ मुंबईला जातात. पण, जनतेने स्विकारले नाही, तर कोणी वखरावरही ठेवत नाही.'
'युती कशी होईल, याबाबत मला शंका'ते पुढे म्हणतात की, 'आगामी काळात आपल्याला मेहनत करायची आहे. लवकरच जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका आहेत. आमच्या जिल्ह्यात सध्या वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव, अशा तीनच नगरपालिका आहेत, बाकी सगळ्या डिझॉल्व्ह झाल्या. तर, नगरपंचायत फक्त फुलंब्रीमध्ये आहे, त्याचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. काही दिवसांपूर्वीच सोयगावची निवडणूक झाली. त्यात 17 नगरसेवक आमचे आणि 2 भारतीय जनता पक्षाचे आले. सिल्लोडमध्येही तीच परिस्थिती, 28 माझे आणि 2 भाजपचे आहेत. आता पुढची युती कशी होईल, याबाबत मला शंका आहे.'
'माझी भाजपला विनंती आहे' 'दोन जागांवर भाजपचे समाधान होऊ शकत नाही आणि 2 पेक्षा जास्त जागा मी देऊ शकत नाही. माझ्यासमोर ही मोठी अडचण आहे. आपण भविष्यात नक्की सोबत निवडणूक लढवू पण, ज्याची शक्ती जास्त असेल त्याला जागा मिळतील. आपल्या आगामी निवडणुका नक्कीच मैत्रीपूर्ण होतील. माझी भाजपला विनंती आहे की, पक्ष वाढवायचा असेल तर स्थानिक निवडणुका मैत्रीपूर्ण वातावरणात होऊ द्या. इतर तालुक्यातील मला माहित नाही, पण माझ्या तालुक्यात माझी मोठी अडचण आहे, मी त्याबाबत मुख्यमंत्र्यांना बोललो आहे,' असेही ते म्हणाले.