छत्रती संभाजीनगर : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत बँकेचे संचालक असलेले राज्याचे अल्पसंख्याक व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा राजकीय बदला घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत डॉ. कल्याण काळे यांनी सत्तारांना सहकार्य केले होते. त्यावेळी सत्तारांनी काळेंना शब्द दिला होता. तो आता त्यांनी पाळला. याउलट हरिभाऊ बागडे यांनी दूध संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्तार यांचा उमेदवार पराभूत केला होता. ही सल सत्तारांच्या मनात होतीच. त्या पराभवाच्या वेळीही सत्तारांनी दूध संघाच्या चौकशीची मागणी केली होती. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी सुहास शिरसाट यांची निवड व्हावी, असे हरिभाऊ बागडे यांना वाटत होते. त्यादृष्टीने त्यांनी खलबते सुरू केली होती. भाजपमधील इच्छुक असलेले जावेद पटेल, दिनेश परदेशी यांनाही गप्प बसविण्यात आले होते. तर दुसरीकडे डॉ. कल्याण काळे यांनी आपले भाऊ जगन्नाथ काळे यांचा आग्रह न धरता किरण पाटील डोणगावकर यांचे नाव पुढे केले. आणि किरण डोणगावकर यांच्या नावाला फारसा कुणाचा विरोध राहिला नाही. समीकरण जुळत नाही आणि मतदान झाल्यास सुहास शिरसाट विजयी होऊ शकणार नाहीत, हा अंदाज आल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी बँकेतून काढता पाय घेतला.
दुसरीकडे अब्दुल सत्तार बँकेत येणार अशी फक्त चर्चाच सुरू राहिली; पण, ते शेवटपर्यंत आलेच नाहीत. त्यांनी हात वर करून दिले, असे भासवले असले तरी त्यांचा पाठिंबा नानांच्या उमेदवाराला नव्हता. अभिषेक जैस्वाल व सुहास शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर किरण पाटील डोणगावकर यांचा एकच अर्ज शिल्लक राहिला आणि त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. किरण पाटील डोणगावकर यांची एकूणच प्रतिमा, शांत व संयमी स्वभाव, वादग्रस्त नसणे, अगोचरपणा न करणे या त्यांच्या जमेच्या बाजू राहिल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचे स्वागतच होत आहे.