छत्रपती संभाजीनगर: बहुचर्चित अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषि खाते काढून घेण्यात आलेले आहे. त्यांचे मंत्रीपद टिकले, हेच आश्चर्य मानले जात आहे. अजित पवारांचे कट्टर समर्थक बीडचे धनंजय मुंडे हे नवे कृषिमंत्री बनतील.
कृषिमंत्री म्हणून अब्दुल सत्तार हे बरेच वादग्रस्त ठरले होते. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप होत होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडील हे खाते काढले ते चांगलेच झाले. नवे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून या खात्याला न्याय मिळेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अब्दुल सत्तार हे आता अल्पसंख्यक, औकाफ व पणन मंत्री बनले आहेत.
अतुल सावे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक. त्यांच्याकडे सहकार या महत्त्वाच्या खात्यासह ओबीसी कल्याण हे खाते होते. त्यातले सहकार खाते आता अजित पवार गटाच्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेले आहे. तर सहकार खात्याच्या बदल्यात त्यांना गृहनिर्माण हे तसे महत्त्वाचेच खाते मिळाले. या खात्यात ते चांगली कामगिरी बजातील, अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या गटाला न्याय दिलाशिंदे गटाचे संदीपान भुमरे यांच्याकडे रोहयो व फलोत्पादन ही खाती त्यांच्याकडेच राहिली आहेत. वाचाळवीर मंत्र्यांमध्ये त्यांचाही समावेश होत होता. सत्तार, भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत हे वाचाळवीर मंत्री वगळा असा दबाव भाजपकडून वाढवला जात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दबावाला बळी न पडता त्यांच्या गटाच्या मंत्र्यांना न्याय देण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहेत. भूम - परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांच्याकडचे सार्वजनिक आरोग्य खाते हे टिकून राहिले आहे. उदगीरचे संजय बनसोडे हे पूर्वी राज्यमंत्री होते. अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा त्यांना फायदा झाला आहे. ते आता राज्याचे क्रिडा, युवक कल्याण व बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले आहेत.