सिल्लोड : शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकर पल्ली यांना मंगळवारी सायंकाळी तहसील कार्यालयासमोर बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खाजगी स्वीय सहायकासह नऊ जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणातील फिर्यादी महेश पल्ली यांच्यावरही जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश पल्ली यांनी सर्व्हे नंबर ९२ मधील फेरफार संबंधित आक्षेप दाखल केला होता. त्याची मंगळवारी दुपारी सिल्लोड तहसीलमध्ये मंडळ अधिकाऱ्यांकडे सुनावणी होती. ही सुनावणी झाल्यानंतर महेश पल्ली हे सायंकाळी बाहेर पडले. तेव्हा त्यांना अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांचा खासगी स्वीय सहायक बबलू चाऊस, शाकेर मिया जानी, बबलू जब्बार पठाण, शेख अब्दुल बासीद शेख सादिक, अकिल बापू देशमुख व इतर तिघे व एक महिला अशा नऊ जणांनी बेदम मारहाण केली.
याप्रकरणी महेश पल्ली यांच्या फिर्यादीवरून वरील नऊ आरोपींविरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर या प्रकरणातील फिर्यादी महेश पल्ली यांच्याविरुद्ध राजेश्वर उत्तम आरके (रा. आंबेडकरनगर, सिल्लोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जातीवाचक शिवीगाळ मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटांच्या लोकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. याप्रकरणी तपास पोनि. शेषराव उदार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे करीत आहेत.