फुलंब्री: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपमध्ये फारसे सख्य नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून केलेला उल्लेख, त्यानंतर सत्तार समर्थकांचा या व्यक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा यामुळे महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच भाजपचा पारंपारिक विधानसभा मतदारसंघ फुलंब्री येथून माजी सभापती किशोर बलांडे यांची उमेदवारी पालकमंत्री सत्तार यांनी आज सकाळी एका कार्यक्रमातून जाहीर केल्याने युतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यत आहे.
फुलंब्री हा भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. येथून भाजपाचे जेष्ठ नेते राज्यपाल हरिभाऊ बागडे आमदार होते. बागडे राज्यपाल झाल्यानंतर भाजपमधून अनेकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातच काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेले आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू किशोर बलांडे यांनी देखील 'लढणार आणि जिंकणार' असे बॅनर मतदारसंघात लावल्याने शिंदेसेनेचा दावा देखील दाखल झाला. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील किशोर बलांडे हे जिल्हा परिषदमध्ये बांधकाम सभापती होते. त्यांनी मागील एक वर्षापासून फुलंब्री मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठिंब्यातून त्यांनी मतदार संघात २५ कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर करून आणली. याच कामांचा आज सकाळपासून विविध गावात पालकमंत्री सत्तार यांनी शुभारंभ केला.
लढणार अन् जिंकणारदरम्यान, निधोना येथील विकास कामांचा शुभारंभाप्रसंगी अब्दुल सत्तार यांनी किशोर बलांडे हे फुलंब्री विधानसभेसाठी उमेदवार असतील, त्यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन ग्रामस्थांना केले. तसेच किशोर बलांडे यांना मराठा आरक्षण लढ्यातील मोठ्या नेत्याचा पाठिंबा असल्याचेही सत्तार यांनी जाहीर केले. मला विधानसभेत जोडीदार असावा म्हणून मी बलांडे यांना येथून उमेदवार करीत आहे. त्यांच्यासाठी धनुष्यबाण चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न करू, काही कारणांनी नाहीच मिळाले तरी बलांडे हे अपक्ष लढणार आणि जिंकणार. माझ्यावतीने त्यांना पूर्ण मदत राहणार आहे असे जाहीर केले.