मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तालुक्यातील खंडाळा -जानेफळ शिवारातील किसनराव चोपडे यांच्या शेतातील मकाच्या एका ताटाला एक, दोन नव्हे तर चक्क नऊ कणसे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साधारणपणे एका ताटाला चार ते पाच कणसे लागत असताना या मक्याच्या बियाणाला दुप्पट कणसे लागल्याने कृषी विभागसुद्धा चक्रावून गेला आहे. हा प्रकार अनियमित पावसामुळे की बियाणामुळे याचा शोध घेण्यासाठी कृषी विभागाने मकाची ताटे परीक्षणासाठी ताब्यात घेतली आहेत.किसनराव चोपडे यांनी जून महिन्यात गट क्र. ६७ मधील एक एकर क्षेत्रावर एका कंपनीच्या मका बियाणाची लागवड केली होती. आता या पिकाला कणसे लागणे सुरु झाले आहे. मात्र, मकाच्या पूर्ण क्षेत्रावर ताटाला चक्क सात, आठ व नऊ चांगल्या दर्जाची कणसे लागल्याने परिसरातील शेतकरी उत्सुकतेने चोपडे यांची मका बघण्यासाठी गर्दी करत आहेत. उत्पन्नात घट होणार की वाढ होणार, या विवंचनेत चोपडे कुटुंब आहे. गुरुवारी कृषी विभागाचे विलास येवले व इतर कर्मचाºयांनी चोपडे यांच्या मका पिकाची पाहणीकेली. संशोधनानंतर कारण स्पष्ट होईल, असे कृषी विभागाचे येवले यांनी सांगितले. तालुक्यात कपाशीनंतर सर्वाधिक २४ हजार ३३२ हेक्टरवर शेतकºयांनी मकाची लागवड केली. चांगल्या उत्पन्नासाठी तालुक्यातील इतर शेतकºयांनी चोपडे यांनी जे बियाणे वापरले तेच बियाणे ६० टक्के क्षेत्रावर लागवड केल्याचे समजते. त्यामुळे कृषी विभागाने आता या क्षेत्रावरील पिकांची माहिती घेणे सुरु केले आहे. मकाकडे कृषी विभाग जातीने लक्ष देणार असून बियाणेकंपनीच्या अधिकाºयांकडून माहिती घेऊ असे, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी सांगितले.
अबब...मक्याच्या ताटाला चक्क नऊ कणसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:38 AM