लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वीज चोरी करून महावितरणचे लाखो रुपयांचे साहित्य अनधिकृतपणे घरी ठेवणाऱ्या लाईनमनवर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. महावितरणचे अधिकारी फिर्याद देण्यासाठी गेले असता, पोलिसांनी हे साहित्य कधी चोरले? याची तारीख सांगा, असे फर्मान सोडले आहे. महावितरण आणि पोलिसांच्या वादात वीज चोरणाऱ्या लाईनमनला अभय मिळत आहे.अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांनी जालना रोड भागात राहाणाऱ्या महावितरणचाच लाईनमन विशाल घाडगे याच्या घरी बुधवारी रात्री तक्रारीवरून झाडाझडती घेतली होती. त्यानंतर येथे मागील अनेक वर्षांपासून वीज चोरी होत असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी लातूरमध्ये सहायक अभियंता राहुल जायभाये यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा लाईनमन घाडगे व त्याची पत्नी नगरसेविका वैशाली घाडगे यांच्यावर दाखल झाला होता.दरम्यान, घाडगे याच्या घरी जवळपास १ लाख ४ हजार रुपयांचे साहित्य आढळले. हे साहित्य महावितरणने जप्तही केले. याची चौकशी करून घाडगेवर चोरीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे अधीक्षक अभियंता सोनवणे म्हणाले होते. त्याप्रमामणे महावितरणचे सर्व अभियंता पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते. परंतु येथील पोलिसांनी त्यांना हे साहित्य कधी चोरी गेले? कोणत्या ठिकाणाहून गेले? ज्या ठिकाणी चोरी गेले, त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा नोंदवा, अशा अनेक सूचना केल्या. वास्तविक पाहता साहित्य सापडलेले ठिकाण हे शहरातील आहे. त्यामुळे गुन्हा हा शहरातच होणे अपेक्षित आहे. साहित्य कधी, कोठून व कशासाठी चोरी गेले होते? याचा तपास लावण्याचे काम हे पोलिसांचे आहे, याचा विसर ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पडला होता. अखेर कोऱ्या कागदावर तक्रार लिहून घेतली. परंतु त्याची नोंद अद्यापही शासन दरबारी नाही. यावरून पोलिसांकडून लाईनमन घाडगेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.दरम्यान, रात्री शनिवारी रात्री उशिरापर्यंत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याचे सांगण्यात आले.
‘त्या’ लाईनमनला अभय!
By admin | Published: June 24, 2017 11:38 PM