छत्रपती संभाजीनगर: परभणी पोलिसांनी अटक केलेल्या तोतया उपजिल्हाधिकाऱ्याने शहरातील सहा जणांना वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल ५४ लाख ९७ हजार रुपयांची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तोतया उपजिल्हाधिकाऱ्यासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
तोतया उपजिल्हाधिकारी अमोल वासूदेव पजई (मराठे) आणि त्याचा साथीदारअनंता मधुकर कलोरे अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार प्रशांत दत्तात्रय भालेराव (३५,रा.हनुमाननगर,गारखेडा) यांची खाजगी ट्रॅव्हल एजन्सी आहे. गतवर्षी २७ ऑक्टोबर २०२२रोजी आरोपीने प्रशांत यांच्याकडून कार भाड्याने नेली होती.तेव्हा त्याने तो उपजिल्हाधिकारी असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने त्यांना वन आणि आरोग्य विभागात नोकर भरती सुरू असल्याचे सांगितले.
या दोन्ही विभागात नोकरी लावून देऊ शकतो,असे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार हे सुशिक्षित बेरोजगार असल्याने ते नोकरीच्या आमिषाला बळी पडले. तक्रारदार यांना वन विभागात पर्यवेक्षक पदी नोकरी लावण्यासाठी त्याने त्यांना १२ लाख रुपये लागतील यातील ८ लाख रुपये आगाऊ आणि नोकरीचे नियुक्तीपत्रे मिळाल्यावर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी आरोपीला ८ लाख६० हजार रुपये दोन्ही आरोपींच्या बँक खात्यात जमा केले.
यानंतर तक्रारदार यांनी त्यांना वन विभागातील नोकरीचे नियुक्तीपत्र तक्रारदार यांना दिले. यासोबतच आरोपींनी अन्य बेरोजगार संजय विजय मुळे,कृष्णा राजू वाघमारे,शाम तुकाराम शिंदे आणि गौरव धर्मराज गोसावी यांच्याकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले. तर अशोक मनोहर विखे यांच्याकडून १४लाख३७ हजार रुपये नोकरीच्या आमिषाने उकळले. आपल्याकडून पैसे उकळणारा तोतया उपजिल्हाधिकारी असल्याचे समजताच तक्रारदार यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात त्यांनी तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चंदने तपास करीत आहेत.परभणी पोलिसांनी पकडल्यानंतर झाली तोतयागिरी उघडकीसउपजिल्हाधिकारी असल्याचे सांगून नोकरीच्या आमिषाने आपल्याकडून पैसे उकळणाऱ्या अमोल पजई(मराठे)हा तोतया असल्याची बातमी तक्रारदार प्रशांत आणि इतरांनी वाचली. पोलिसांनी त्यास अटक केल्याचे न्यूज चॅनलवरही तक्रारदार यांनी पाहिली आपली फसवणुक झाल्याचे समजले. सहा जणांची तब्बल ५४ लाख ९७ हजाराची फसवणुक करण्यात आल्याचे समोर आले.