यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. त्यामुळे त्यांना गेल्या काही हंगामात झालेला तोटा भरून काढता आला. आता कायगाव परिसरातील शेतकरी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करीत आहेत.
काही दिवस कांद्याच्या रोपांचे भाव गगनाला भिडले होते. आता मात्र रोपांचे भाव पुन्हा सामान्य झाले आहे. आता हळूहळू कांद्याचे दर कमी होऊ लागल्याने नवीन कांदा काय दराने विकावा, याची शेतकऱ्यांना चिंता आहे. कायगाव परिसरातील जुने कायगाव, लखमापूर, अंमळनेर, गणेशवाडी, पखोरा, भेंडाळा, धनगरपट्टी, अगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब आदी भागात सुमारे २ हजार हेक्टर कांद्याची लागवड होण्याची अपेक्षा आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसावर केलेला खर्चही परत मिळाला नाही. आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त रब्बीवर अवलंबून असणार आहे.
गेल्या काही हंगामात परिसरातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यात आणि लवकर हाती येणारे पीक म्हणून मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली होती. यावर्षी सर्वत्र मोठा पाऊस झाला. त्यामुळे सगळीकडे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कांद्याचे उत्पादन जास्त झाले तरी, दर खाली येऊ नये, अशी शेतकऱ्यांना आशा असते.
चौकट
एकरी पन्नास हजारापर्यंत खर्च
कांदा उत्पादन करण्यासाठी सुमारे एकरी चाळीस ते पन्नास हजारांचा खर्च येतो. त्यामुळे चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना कांदा परवडतो.
कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच पुढील हंगामातील पिकांचे नियोजन अवलंबून असते.
फोटो : रब्बीचे पीक म्हणून कायगाव परिसरात शेतकरी कांदा लागवड करीत आहेत.(तारेख शेख)