छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे १२ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातून सुमारे दोन हजार चारचाकी वाहनाने जाण्याचे नियोजन समाजबांधवांनी केल्याची माहिती मराठा समाज समन्वयक प्रा. चंद्रकांत भराट आणि सुरेश वाकडे यांनी गुरुवारी येथे दिली.
हडकोतील मराठा मंदिर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना प्रा. भराट म्हणाले की, मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन छेडले आहे. सहावेळा उपोषण करून, मुंबईला माेर्चा नेऊनही सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य केली नाही. आता येत्या काही दिवसांत राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटील यांनी बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे १२ ऑक्टोबर रोजी सकाळी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागातून जास्तीत जास्त मराठा समाजाने उपस्थित राहावे, यासाठी मागील आठ दिवसांपासून मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.
दसरा मेळाव्याला शहरातून यावेळी एक हजार चारचाकी आणि ग्रामीण भागातून प्रत्येक गावांतून दोन चारचाकीने समाजबांधव जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला सतीश वेताळ, मनोज गायके, सतीश निकम, निवृत्ती डक आणि अन्य समाजबांधवांची उपस्थिती होती
शरद पवार यांनी मराठा समाजाचे नुकसान केलेराष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदी असताना मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण ओबीसीला देऊन टाकले. त्यांच्यामुळे आज मराठा समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा आरोप प्रा. भराट यांनी केला.