वाळूज महानगर: दोन दिवसांपूर्वी वाळूज पोलीस ठाण्यातून फरार झालेला आरोपी गणेश अण्णासाहेब बन्सोडे (२५) यास रविवारी पहाटे वाळूज पोलिसांनी पुणे जिल्ह्यात जेरबंद केले. आरोपी गणेश याने बहिणीच्या घरी आश्रय घेतला होता.
वाळूज पोलिसांनी ८ मे रोजी लुटमार प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरुन आरोपी गणेश अण्णासाहेब बन्सोडे (रा.नांदलगाव ता.पैठण) याला ताब्यात घेतले होते. शुक्रवारी आरोपी गणेशला चौकशीसाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील लॉकअपमधून वाळूजला नेण्यात आले होते. वाळूज पोलीस ठाण्यात फौजदार रामचंद्र पवार हे आरोपी गणेशची चौकशी करीत होते.
दरम्यान, फौजदार पवार यांना चकमा देत गणेश फरार झाला होता. आरोपीच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे ३ तर वाळूज पोलीस ठाण्याचे ६ पथक रवाना करण्यात आले होते. दरम्यान, गणेशचे नातवाईक पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यावरुन पोलीस पथकाने शनिवारी दिवसभर गणेशच्या नातेवाईकाचा शोध घेतला. दरम्यान, पैठण तालुक्यातील एक कुटुंब हवेली तालुक्यातील वडगाव (शिंदे) येथे शेतवस्तीवर असल्याची माहिती मिळाली. तेथून सापळा रचून गणेश पकडले. त्यानंतर त्याला वाळूजमध्ये आणण्यात आले.