औरंगाबाद : मुकुंदवाडी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला आरोपी अमर गायकवाड ऊर्फ अमऱ्याने एक कॉल त्याच्या आईच्या मोबाइलवर केला आणि तो मनमाड रेल्वेस्थानकात असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची मदत घेऊन अवघ्या काही मिनिटांत त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
आरोपी अमर गायकवाडला आणण्यासाठी मुकुंदवाडी पोलिसांचे पथक मनमाडला रवाना झाले आहे. वृद्धाला मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे हिसकावल्याच्या आरोपाखाली मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाडला ९ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली होती. पोलीस हवालदार दादा काटकर आणि कर्मचारी बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर करण्याची तयारी करत होते. मुकुंदवाडी ठाण्यात नोंद करून त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसविले. हातकडी टोचत असल्याची तक्रार त्याने केल्याने पोलीस कर्मचारी त्याच्या एका हातातील हातकडी काढून दुसऱ्या हातात घालत होते. याचवेळी पोलीस हवालदार काटकर यांच्या हाताला झटका देऊन अमर गाडीतून उडी मारून पळून गेला.
रात्रभर शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्याजवळ मोबाइल नव्हता. पोलिसांनी त्याच्या आईच्या मोबाइलवर येणाऱ्या कॉलवर नजर ठेवली. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्याने मनमाड रेल्वेस्थानक येथे एका प्रवाशाच्या फोनवरून आईच्या मोबाइलवर कॉल केला. हा कॉल येताच त्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी मनमाड येथील जीआरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या मोबाइल व्हॉटस्ॲपवर आरोपी अमऱ्याचे फोटो पाठवून त्याला पकडून ठेवण्यास सांगितले. अवघ्या काही मिनिटांत जीआरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी मनमाड स्थानकातील एका प्लॅटफॉर्मवर बसलेल्या अमर ऊर्फ अमऱ्याला पकडले. त्याला ताब्यात घेण्यासाठी मुकुंदवाडी ठाण्यातील पथक रवाना झाल्याचे सूत्राने सांगितले.