लाडसावंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या कारभारावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. या केंद्रातील आरोग्य कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे. याबाबत लोकांनी तक्रार केल्यानंतर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले.
लाडसावंगी येथे रविवारी (दि.३१) पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, सीईओ मंगेश गोंदावले. पं. स. सभापती छाया घागरे, जि. प. सदस्य रेणुका शिंदे, प. स. सदस्य अर्जुन शेळके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी लाडसावंगी येथील लोकांनी आरोग्य केंद्रातील कारभाराचा पाढा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडला. येथील कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहतात. त्यामुळे रुग्णांना तासनतास ताटकळत बसावे लागते. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी २५ जानेवारी रोजी आरोग्य केंद्राची अचानक भेट देऊन तपासणी केली होती. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी सरपंच सुदाम पवार यांनीदेखील केली. त्यावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले.
------------------
३९२ बुथवर झाले लसीकरण
औरंगाबाद तालुक्यात ५४ हजार ५४१ लाभार्थींना पल्स पोलिओचा डोस देण्यासाठी ३९२ बुथ तयार केले गेले होते. १११८ कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले असून १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांनी सांगितले.
----
फोटो : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभप्रसंगी चिमुकल्यांना पोलिओ डोस देताना जि.प. सीईओ डॉ. गोंदावले, जि. प. अध्यक्ष मीना शेळके.