औरंगाबाद : सिटी बसमध्ये महिला वाहकास किरकोळ कारणावरून एका प्रवाशाने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी रात्री साडेआठ वाजता मध्यवर्ती बसस्थानक ते टी.व्ही. सेंटर दरम्यान घडला आहे. या प्रकरणात वाहकाच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दस्तगीर नबीसाब चौधरी (२४, रा. फुलेनगर, मुखेड, जि. नांदेड) असे या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको ते रेल्वेस्टेशनदरम्यान बस (एमएच २०, ईएल ५५२) रेल्वेस्टेशन येथून रात्री ८ वाजून २० मिनिटांनी सुुरू झाली. या बसमध्ये वाहक प्रतिभा काशिनाथ दिवटे-एंडोले (रा. कैलासनगर) आणि चालक बी. के. वाहूळ होते. बसमध्ये ८ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांचे पैसे घेऊन तिकीट देण्यात आले. नियमित मार्गाने ही बस मध्यवर्ती बसस्थानकात रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचली. तेव्हा एका दिव्यांग प्रवाशाने बस आतमध्ये जात नसतानाही आपण का घेऊन गेलात, असा प्रश्न उपस्थित केला. यावर वाहकाने नियमित मार्गानेच बस जात असल्याचे सांगितले असता, दिव्यांग प्रवाशासह इतर एका प्रवाशाने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाहकाच्या हातातील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न करीत शिवीगाळ केली. तेव्हा बस टीव्ही सेंटर येथील पोलीस चौकीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे बस थांबवून चौकीतील पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी शिवीगाळ करणाऱ्या प्रवाशास ताब्यात घेत बेगमपुरा पोलीस ठाण्यात आणले. चौधरी याच्या विरोधात शासकीय कामकाजात आडथळा निर्माण करून वाहक व चालकास शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत हर्सूल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी दिले.