औरंगाबाद : पत्रकारांवर आणि जेएनयू विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या संघटनांच्या निषेधार्थ भाकप, अखिल भारत शिक्षण अधिकार मंच, एआयएसएफसह डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पैठणगेट भागात निदर्शने आयोजित केली होती. दरम्यान, याच ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळापुरते या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यामुळे या भागात गोंधळ उडाला होता. बंदोबस्तावरील पोलिसांनी काही अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.याबाबत फौजदार संजय अहिरे यांनी सांगितले की, अखिल भारत शिक्षण अधिकार मंच, औरंगाबादचे कॉ. अॅड. मनोहर टाकसाळ, अॅड. रमेशभाई खंडागळे, बुद्धप्रिय कबीर, अभय टाकसाळ, एस.जी. शुक्तारी, अर्जुन भूमकर, प्रा. भारत शिरसाट, रमेश जोशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पैठणगेट भागात मंगळवारी सायंकाळी एकत्र आले होते. त्यांनी आंदोलनाची रीतसर परवानगी घेतली होती. ते येथे आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांचा निषेध नोंदवीत असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून घोषणाबाजी केली. यामुळे या दोन्ही संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या. यामुळे काहीकाळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. यावेळी क्रांतीचौक पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्तावरील पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना परवानगी विचारली असता त्यांच्याकडे परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अभाविपच्या काही कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. याप्रकरणी गैरकायद्याची मंडळी जमवून जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केले म्हणून कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अभाविप-डाव्या संघटना आमने-सामने
By admin | Published: February 16, 2016 11:51 PM