लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागातील शैक्षणिक उपक्रम, तासिका, संशोधन, संशोधनाच्या दर्जासह इतर कामांचे मूल्यमापन करण्यास सोमवारी (दि.२३) सुरुवात झाली. या शैक्षणिक आॅडिटसाठी दोन माजी कुलगुरूंसह देशभरातून तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे. पहिल्या दिवशी १९ विभागांना प्रत्येकी दोन सदस्य असलेल्या सहा टीमने भेट देऊन आढावा घेतल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक संस्थांना आॅडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकारनेही कायद्यात शैक्षणिक आॅडिटचा अंतर्भाव केला. मात्र बहुतांश शैक्षणिक संस्था आॅडिट करण्यास धजावत नव्हत्या. विद्यापीठ सप्टेंबर महिन्यामध्ये ‘नॅक’च्या थर्ड सायकलला सामोरे जात आहे. या परीक्षेची चाचणी आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठातील विभागाचे शैक्षणिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. या आॅडिटसाठी देशभरातून विविध नॅकच्या समित्यांवर काम केलेल्या तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे. यात दोन माजी कुलगुरूंचाही समावेश असल्याचे डॉ.अशोक तेजनकर यांनी सांगितले. आॅडिट करण्यासाठी २३ ते २५ तारखेदरम्यानचे वेळापत्रक बनविण्यात आले आहे. यात विद्याशाखानिहाय सहा समित्यांमार्फत विभागाची तपासणी करण्यात येत आहे. या समित्या प्रत्येक विभागातील होणाऱ्या तासिका, शैक्षणिक उपक्रम, संशोधन, संशोधनाचा दर्जा, प्राध्यापकांना मिळालेले संशोधनाचे प्रकल्प, प्राध्यापकाचे विभागाच्या विकासातील योगदान तपासण्यात येत आहे. यातून प्रत्येक विभागाच्या प्रगतीचा आलेख समोर येणार आहे.उपकेंद्र, मॉडेल कॉलेजची तपासणी होणारविद्यापीठाचा भाग असलेल्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रातील सर्व विभागाचेही आॅडिट केले जाणार आहे. यासाठी समिती २४ व २५ जुलै रोजी उस्मानाबादला जाणार आहे. तर घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजला समिती २५ जुलै रोजी भेट देणार आहे. या समितीच्या समन्वयासाठी विद्यापीठ प्रशासनाने डॉ. भारती गवळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.या तज्ज्ञांचा समावेशविद्यापीठाच्या शैक्षणिक आॅडिटसाठी माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी, जयपूर येथील प्रो. एन. आनंद, दिल्ली येथील प्रो. स्मृती स्वरूप, प्रो. एस. पी. मल्होत्रा, प्रो. डी. के. गौतम, प्रो. क्षमा अगरवाल, प्रो. विजया देशमुख, प्रो. अमिता सिंग, प्रा. वनी लातूरकर, प्रो. उमा जोशी आदींचा समावेश आहे.
इतिहासात पहिल्यांदाच शैक्षणिक आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:48 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागातील शैक्षणिक उपक्रम, तासिका, संशोधन, संशोधनाच्या दर्जासह इतर कामांचे मूल्यमापन करण्यास सोमवारी (दि.२३) सुरुवात झाली.
ठळक मुद्देविद्यापीठ : माजी कुलगुरूंसह देशभरातून तज्ज्ञ दाखल; पहिल्या दिवशी केली तपासणी