---
औरंगाबाद : शैक्षणिक वर्षाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित होण्याच्या कोणत्याही सूचना अद्याप मिळाल्या नाहीत. तरीही ग्रामीण भागातील शाळांमध्ये ५० टक्के, तर महानगरपालिका क्षेत्रातील शाळांत १०० टक्के शिक्षकांच्या पूर्णवेळ उपस्थितीत शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मान्यतेने सीईओंनी दिलेल्या आदेशात मंगळवारी (दि. १५) शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे व शाळांच्या निर्जंतुकीकरणाचे नियोजन करण्यात यावे. तसेच शाळेत उपस्थित शिक्षकांनी प्रवेशपात्र मुलांचे सर्वेक्षण, पटनोंदणी, सुंदर माझी शाळाअंतर्गत स्वच्छता, रंगरंगोटीची कामे पूर्ण करावीत. याबाबत शाळा समितीची मान्यता घ्यावी, असा आदेश सीईओ डाॅ. गोंदावले यांनी गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना सोमवारी दिला, अशी माहिती शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.
---
शाळाच न पाहिलेल्या वर्गोन्नत विद्यार्थ्यांवर लक्ष देणार
---
गेल्या वर्षी पहिलीच्या व यंदा दुसरीच्या विद्यार्थ्यांवर, शाळाच न पाहिलेल्या वर्गोन्नत विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कोरोनामुळे पहिलीचे विद्यार्थी थेट शाळेत न जाता दुसऱ्या वर्गात गेले, तर दुसऱ्या वर्गात अर्धे वर्ष शाळेत गेलेले विद्यार्थी आता तिसरीत गेले. यासह गेल्या वर्षभरातील उणीवा, अडचणींची उजळणी करून नव्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने काही नियोजन करता येईल का, हे पुढील आठवडाभरात शिक्षण विभागाशी चर्चा करून ठरवू, असे डाॅ. गोंदावले म्हणाले.