पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन तक्रारदारांचा गौरव
औरंगाबाद : भ्रष्ट लोकसेवकाविरुद्ध तक्रार नोंदवून त्यांना त्यांची जागा दाखविणाऱ्या धाडसी तक्रारदारांना पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गौरवण्यात आले.
जुना बाजार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या हस्ते तक्रारदारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
लाचखोरांवर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेतली जाते. लाचेची रक्कम पावडर लावलेली असते आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ती मुद्देमाल म्हणून जप्त असते. कारवाई करताना तक्रारदाराने दिलेली रक्कम शासनाकडून तक्रारदाराला परत करण्यात येते. औरंगाबाद परिक्षेत्रातील जालना, बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २०२० मध्ये झालेल्या कारवाईतील तक्रारदारांना २३ लाख ८० हजार रुपये एसीबीने परत केले.