उस्मानाबाद : दर्जाहीन बॅनर बनविल्याची तक्रार न करणे व त्याची चौकशी न लावण्यासाठी तक्रारदाराकडून २२ हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती लता अनिल पवार, त्यांचे स्विय सहाय्यक पांडुरंग अण्णासाहेब वेदपाठक व मेडिकल व्यवसायिक आण्णासाहेब माढेकर या तिघांविरूध्द एसीबीने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास येरमाळा येथे कारवाई केली़ तक्रारदाराने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात ‘बेटी बचाव व बेटी पढाओ’चे बॅनर तयार करण्याचे ई-टेंडर नोव्हेंबर २०१६ मध्ये घेतले होते़ त्याप्रमाणे त्यांचे ट्रेडिंग कंपनीला २४७६ बॅनर्सचा पुरवठा करण्याचे काम मिळाले होते़ तक्रारदार यांनी सदरची आॅर्डर दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पूर्ण केली होती़ या आॅर्डरचे ११ लाख ६६ हजार ८१५ रूपयाचे बील चेकद्वारे त्यांना २८ फेब्रुवारी रोजी मिळाले होते़ तक्रारदार यांनी तयार केलेले बेटी बचाव व बेटी पढाओचे बॅनर निकृष्ठ दर्जाचे बनविले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे न करण्यासाठी व सदर प्रकरणात चौकशी न लावण्यासाठी म्हणून बिलाच्या ५ टक्के प्रमाणे तक्रारदाराकडे सभापती लता अनिल पवार, स्विय सहाय्यक पांडुरंग आण्णासाहेब वेदपाठक यांनी मागणी करून २३ मार्च रोजी घेऊन येण्यास सांगितल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीकडे केली होती़उपाधीक्षक बी़व्हीग़ावडे यांनी त्यांचे सहकारी पोहेकॉ रवींद्र कठारे, पोना बालाजी तोडकर, पांडुरंग डमरे, पोकॉ नितीन तुपे, चालक पोना धनंजय म्हेत्रे यांच्या समवेत सभापती पवार, स्विय सहाय्यक वेदपाठक यांच्या लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर तक्रारीत तथ्य आढळून आले़ त्यानंतर सापळा वेदपाठक यांनी २२ हजार लाचेची मागणी करून मेडिकल दुकानदार आण्णासाहेब माढेकर यांच्याकडे ठेवण्यास सांगितले़ दुकानदाराने पैसे स्विकारल्यानंतर एसीबीने कारवाई केली़ या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़
‘झेडपी’च्या सभापतीसह तिघांवर ‘एसीबी’ची कारवाई
By admin | Published: March 24, 2017 12:37 AM