औरंगाबाद : गेल्या सात वर्षांपासून केवळ कागदावर असलेल्या आणि दूध डेअरीतील जागेत प्रस्तावित २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीला अखेर गती मिळाली आहे. या रुग्णालयाच्या उभारणीच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी दिली.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या महिला रुग्णालयाच्या बाजूने एक पाऊल पुढे पडले आहे. या रुग्णालयासाठी जागेच्या शोधात किमान सात वर्षे लोटली. २९ ऑगस्ट २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयासाठी दूध डेअरीची जागा आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातून ११ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता. अखेर १११ कोटी ८९ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाला टोकन रक्कमी मिळाली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच रुग्णालयाच्या उभारणीला सुरुवात होईल, असे डाॅ. स्वप्नील लाळे म्हणाले.
४ मजली इमारत, ८४ निवासस्थाने, धर्मशाळा
प्रस्तावित रुग्णालयाची तळमजला आणि ४ मजली इमारत राहणार आहे, तर वर्ग १ ते वर्ग ४च्या कर्मचाऱ्यांसाठी ८४ निवासस्थाने आहेत. एक धर्मशाळाही प्रस्तावित आहे.
'एमसीएच विंग'चा तिढा कायम
घाटीत दोनशे खाटांची 'मदर ॲण्ड चाइल्ड हेल्थ केअर विंग' (एमसीएच विंग) करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. परंतु दूध डेअरी की घाटी, अशा अवस्थेत एमसीएच विंग अडकले. यासंदर्भात आता काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.