औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेत १६५ खाटा वाढविण्यासाठी नव्याने ३६० पदांच्या निर्मितीस गुरुवारी (दि.२१) शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. त्यामुळे रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला गती मिळणार आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६ जानेवारी रोजी मान्यता मिळाली होती. या वाढीव खाटांमुळे हे रुग्णालय आता २६५ खाटांचे होणार आहे. रुग्णालय विस्तारीकरणाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली. विस्तारीकरणात सध्याच्या इमारतीवर एक मजला वाढणार आहे. आगामी १५ महिन्यांत बांधकाम पूर्ण होणार आहे. या विस्तारीकरणामुळे १६५ खाटा वाढणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यताही देण्यात आली. त्यासोबत विस्तारीकरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या ३६० पदांच्या निर्मितीलाही मान्यता मिळाली. त्यामुळे येथील मनुष्यबळ वाढण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. सध्या रुग्णालयात ३५९ एवढे मनुष्यबळ आहे.
विस्तारीकरणात किरणोपचार विभागात सेकंड युनिट होणार आहे. त्यामुळे रुग्णांना उच्च दर्जाच्या किरणोपचाराची सेवा मिळणार आहे. एमआरआय, सीटीस्कॅन आदी यंत्रसामग्रीही प्राप्त होणार आहे.
ही आहेत नवीन पदे
प्राध्यापक -१०, सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांची प्रत्येकी १३, वरिष्ठ निवासी-२८, परिसेविका-अधिपरिचरिका-१९५, तांत्रिक संवर्ग-३६, प्रशासकीय-१५, चतुर्थश्रेणी-६, बाह्यस्रोत-४४