विभागातील दळणवळण : पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एनएचएआयमार्फत कामे
औरंगाबाद : मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्ते बांधणीची कामे वेगाने सुरू असून, त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व रस्त्यांच्या कामांचा आणि प्रलंबित भूसंपादन प्रकरणाचा आढावा घेतला. भूसंपादनांची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून रस्ते बांधणीतील अडथळे दूर करण्याच्या सूचना त्यांनी महसूल यंत्रणेला केल्या. विभागात काही ठिकाणी मोजणी, निवाडे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठवाड्यात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यासाठी तीन प्रमुख यंत्रणाच्या माध्यमातून रस्ते बांधले जात आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रस्ते होत आहेत. त्यामध्ये अर्धापूर ते हिमायतनगर ६४ किमी, बारसगाव रहाटी ५२ किमी, भोकर ते सरसम ३२ किमी रस्त्याचे भूसंपादन होणार आहे. तर सरसम ते कोठारी ५७ किमी, कोठारी ते धनोडा ५६.८ किमी, उस्मानगर ते कुंद्राल ५२.०७ किमी, कुंद्राल ते वझर ४६.५२ किमी तर नांदेड ते जळकोट ६५.९५ किमीचे रस्ते होणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग ते अक्कलकोट ३९.८२ किमीचा रस्ता होणार आहे, तर लातूर जिल्ह्यात रेणापूर फाटा ते पानगाव २०.२ किमीचा रस्ता होणार आहे, तर लातूर ते रेणापूर फाटा २१.७५ किमी जळकोट ते टोंगरी ४५.५५ हा रस्ता होणार असून, भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. बैठकीला पुनर्वसन उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, एमएसआरडीसीचे साळुंके, एनएचएआयचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद-सिल्लोड-फर्दापूर रस्ता पूर्ण होणार
औरंगाबाद ते सिल्लोड तसेच पैठण-शिरुर हा ११.२० किमीचा रस्ता होणार आहे. सिल्लोड ते फर्दापूर हा ३२.६३ किमी रस्ता होणार आहे, तर जालना जिल्ह्यात भोकरदन ते हसनाबाद ६६ किमीचा रस्ता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बीड जिल्ह्यात शिरूर ते पैठण रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. तसेच शिरूर ते खर्डा ४२.५ किमी, लोखंडी सावरगाव ते रेणापूर फाटा ३८.२७ किमी, खरवंडी ते राजुरी ६.३० किमीचा रस्ता होणार आहे.