सेनगाव : नगरपंचायतमधील नगराध्यक्ष निवडीपासून सुरू झालेल्या राजकीय कलगीतुरा समित्या स्थापनेच्या बैठकीनंतर स्वीकृत सदस्य निवडीतही पहावयास मिळाला. विरोधकांना दोन हात दूर ठेवण्यासाठी सत्ताधारी सलग दुसऱ्या बैठकीस गैरहजर राहिले असून, कोरमअभावी मंगळवारी स्वीकृत सदस्य निवडीची बैठक रद्द करावी लागली. उपविभागीय अधिकारी राहुल खांडेभराड यांच्या उपस्थितीत दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष बैठक बोलावली होती; परंतु सत्ताधारी गटाचे सर्व दहा सदस्य गैरहजर राहिले. तर विरोधी काँग्रेस-मनसे गटाचे सात सदस्य उपस्थित होते. कोरमअभावी स्वीकृत सदस्य निवड बैठक रद्द करावी लागली. सत्ताधारी व विरोधी गटाच्या वाट्याला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य पद येणार होते. परंतु विरोधी गटाच्या वाट्याला एकही पद येवू द्यायचे नाही. या राजकीय खेळीकरिता सत्ताधाऱ्यांनी बैठकीस गैरहजर राहणे पसंद केल्याची चर्चा नगरपंचायत वर्तुळात होती. सत्ताधारी गटाकडून सेनेचे अॅड. पांडुरंग देशमुख तर विरोधी गटाकडून मनसेचे जिल्हा सचिव संदेश देशमुख यांची नावे स्वीकृत सदस्य पदासाठी दोन्ही गटाच्या वतीने निश्चित झाली होती; परंतु बैठक रद्द झाल्याने प्रतीक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)
स्वीकृत सदस्य निवड बारगळली
By admin | Published: February 16, 2016 11:33 PM