चित्तेपिंपळगाव : ‘यमदूत’ बनलेल्या निपाणीजवळील विचित्र पुलाने मंगळवारी रात्री दोन तरुणांचा बळी घेतला. नियंत्रण सुटून दुचाकी पुलात कोसळल्याने झालेल्या या अपघातात एक जण जखमी झाला आहे. नारायण देवीदास नाबदे (३६) आणि अशोक उत्तम डिघुळे (३८, दोघेही रा. भालगाव), अशी मृत तरुणांची नावे आहेत. शिवाजी विश्वनाथ डांगे या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरूआहेत. बीड बायपासवरील निपाणी परिसरात सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरूआहे. या भागातील विचित्र पुलावरील कठडे तुटलेले आहेत. रात्रीच्या वेळी पुलाचा मधील भाग दिसत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. हा विचित्र पूल एकप्रकारे ‘यमदूत’च ठरत आहे. भालगाव येथील अशोक डिघुळे, नारायण नाबदे आणि शिवाजी डांगे हे तरुण औरंगाबादेतील काम आटोपून रात्री आठनंतर परतत होते. कठडे नसलेल्या विचित्र पुलावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलात कोसळली. या अपघातात नारायण नाबदे यांचा जागीच मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना अशोक डिघुळेची प्राणज्योत मालवली. नारायण नाबदे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण, असा परिवार आहे. अशोक डिघुळे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील, असा परिवार आहे. चिकलठाणा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, जमादार शेख शकील तपास करीत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बीड बायपास रोडवर रस्त्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी कंत्राटदाराने नियमानुसार ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या न केल्याने अपघात झाल्याचा आरोप निपाणी परिसरातील नागरिकांनी केला आहे.
निपाणीजवळ अपघात; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2016 1:21 AM