छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवरील बाळापूर फाट्याजवळील पुलाखाली एक अर्धनग्न मृतदेह रविवारी सकाळी आढळला. या तरुणाची ओळख पटली असून, चार दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार जवाहरनगर पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी नोंदविली होती. हा अपघात आहे की खून, याविषयीचा तपास पोलिस करत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतरच त्याविषयीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुदास रावसाहेब काळे (३७, रा. बाजार वाहेगाव, ता. बदनापूर) असे मृताचे नाव आहे. भानुदास हा जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका दवाखान्यात गावाकडून दुचाकीवर १९ एप्रिल रोजी आला होता. त्याने शहरात राहणाऱ्या भावाला फोन करून त्याच्याकडे येणार असल्याची माहितीही दिली होती. मात्र, तो भावाकडे गेलाच नाही. तसेच गावीही परतला नाही. त्यामुळे जवाहरनगर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
रविवारी सकाळी बाळापूर फाट्याच्या पुढे असलेल्या पुलाच्या खाली एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एम. सिडकाेचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक सचिन जाधव यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पुलाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या उघड्या भागातून दुचाकी पुलाच्या खाली पडली असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला. भानुदासचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या अंगावरील कपडेही निघालेले होते. त्यामुळे हा खून आहे की अपघात, हे गूढ शवविच्छेदनानंतर उलगडणार आहे. या प्रकरणी एम. सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सखोल तपास सुरु आहेबाळापूर पुलाच्या खाली मृतदेह सापडला आहे. प्राथमिक पाहणीनुसार हा अपघात वाटतो. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिस सर्व बाजूंनी सखोल तपास करीत आहेत.- गौतम पातारे, निरीक्षक, एमआयडीसी सिडको