वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात अपघात सत्र सुरुच असून, शुक्रवार एफडीसी कॉर्नरजवळ भरधाव ट्रकच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या क्लिनरचा शनिवारी मृत्यू झाला आहे. या परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे.
भारतसिंग अमृतलाला (२५ रा.फुसफुरा ता.जि.धौलपूर, राजस्थान) हा मेवात ट्रॉन्सपोर्टवर ट्रकचालक (आर.जे.११, जी.ए.७१०६) म्हणून तर त्याचा भाऊ संतोष सिंग (२३) हा क्लिनर म्हणून काम करतो. दरम्यान, उत्तरप्रदेशातील नोएडा येथून ट्रकमध्ये पॉलिथीन बॅगा घेऊन चालक भारतसिंग व क्लिनर संतोषसिंग हे २३ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीत आले होते. या परिसरातील आरएसपीएल कंपनीचा माल पोहोच करण्यासाठी या दोघांनी कंपनीजवळ ट्रक उभा केला होता.
दरम्यान, सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोघे नाष्टा करण्यासाठी एका कॅन्टीनच्या दिशेने पायी जात होते. याच वेळी एफडीसी कंपनीकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम.एच.०४, सी.ए.६५८९) रस्ता ओलांडणाºया संतोषसिंगला धडक दिली. घटनेनंतर तात्त्काळ भारतसिंगने नागरिकांच्या मदतीने संतोषला रस्त्याच्याकडेला हलविले. १०८ रुग्णवाहिकेतून त्याला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास दोघेही भाऊ पुन्हा एमआयडीसीत परतले होते. रात्री जेवण केल्यानंतर भारतसिंग व संतोषसिंग हे ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपी गेले होते.
शनिवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास चालक भारतसिंग संतोषसिंग याला चहा पिण्यासाठी उठवित होता. मात्र, तो झोपेतून उठत नसल्याने भारतसिंगने ट्रॉन्सपोर्टच्या कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर संतोषसिंग याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सकाळी १० वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी चालक भारतसिंग याच्या तक्रारीवरुन फरार आयशर चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे हे करीत आहेत.
तीन दिवसात तिघांचा बळीवाळूज एमआयडीसी परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे. साजापूरच्या पेट्रोल पंपाजवळ २२ नोव्हेंबरला रिक्षा नादूरुस्त ट्रकवर धडल्यामुळे रिक्षाचालक जालिंदर भुजाडी यांचा मृत्यू झाला होता. २३ नोव्हेंबरला प्रकाशसिंग सज्जनसिंग मुनोत यांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर तिसºया दिवशी आयशरच्या धडकेने संतोष सिंग याचाही बळी गेला आहे.
वाहतुक शाखा कुचकामीवाळूज उद्योगनगरीत बेशिस्त वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वाळूज उद्योगनगरीसाठी स्वतंत्र वाहतुक शाखेची निर्मिती होऊनही वाहतुकीला शिस्त लागत नसल्यामुळे नागरिक व वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.-------------------------------