वाळूज महानगर : वाळूज-नारायणपूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बजाजनगरातील ५४ वर्षीय बजाज अॅटो कंपनीचा कामगार ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. रमेश अंबादास जांभळे असे मृत कामगाराचे नाव आहे. दरम्यान, जांभळे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करुन चौकशीची मागणी केली आहे.
रमेश जांभळे (५४, रा. आरएक्स १/६ न्यू विसावा हौ.सो. बजाजनगर) हे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज कंपनीत कामाला आहेत. जांभळे हे शुक्रवारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घरुन दुचाकीवर (एमएच -२०, एडब्ल्यु - २६३२) कामाला गेले. सेकंड शिफ्ट रात्री १२:२० ला सुटत असल्याने साडेबारा ते पाऊ ण वाजेच्या सुमारास घरी येतात. मात्र, शुक्रवारी ते कामावरुन घरी आले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला.
मात्र, ते कुठेच मिळून आले नाही. शनिवारी (दि.८) सकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्तीने मुलगा विजय यांना फोन करुन लांझी फाटा रस्त्यावरील नारायणपूर पुलाजवळ रमेश जांभळे यांचा अपघात झाल्याची माहिती दिली. मुलगा विजय, पुतण्या सचिन व जावई दिलीप पेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जांभळे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले.
नातेवाईकांनी त्यांना बजाजच्या रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून जांभळे यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार अमित बागुल, स.फौजदार दत्तात्रय साठे, पोह. कासरले यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. दरम्यान, हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय रमेश जांभळे यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.