कन्नड - तालुक्यातील मोहरा येथील भवानी मातेच्या यात्रेत मुलाचा नवस फेडण्यासाठी निघालेल्या वडिलांचा दुचाकी आणि ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले. हा अपघात कन्नड - पिशोर रस्त्यावर आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गौताळा अभयारण्याच्या कमानीजवळ झाला.
भागवत विलास सनान्से ( ४०, रा. मोहाडी जि.धुळे ) यांनी मुलाचा नवस फेडण्यासाठी आई - वडील, पत्नी व मुले यांना मोहरा येथे बुधवारीच मोहराकडे रवाना केले. आज दुपारी ते एकासोबत दुचाकीने ( क्र. एमएच १८ एक्यु ९५१६ ) मोहरा येथे निघाले. गौताळा अभयारण्याच्या कमानीजवळ समोरून भरधाव वेगाने कन्नडकडे जाणाऱ्या ट्रक ( क्र. एमएच ४० बीएल १९३४ ) व दुचाकीत समोरासमोर धडक झाली.
या अपघातात भागवत सनान्से जागीच ठार झाले तर त्यांचा साथीदार ( नाव माहीत नाही ) गंभीर जखमी झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ गणेश जैन, पोकॉ सागर सुलाणे, अंमलदार विशाल कुलकर्णी व चालक किसन जारवाल यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमीस उपचार कामी हलविले.