वैजापूर येथील मिल्लत नगरातील रहिवासी शेख जावेद हे चटाई विक्रीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. लॉकडाऊनमुळे धंद्यात मंदी आल्याने ते महिनाभरापूर्वी दौलताबाद येथील मुजीब कॉलनीत राहण्यासाठी आले होते. येथेही ते चटाई विक्रीचे काम करीत असत. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान ते दुचाकीने खेड्यांमध्ये चालले होते. यावेळी खुलताबादहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कार (एम.एच.- २० बी.सी.) ने दौलताबाद घाटाखाली आम मस्जीदजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात जावेद हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस स्टेशनचे डी. बी. तडवी, रामेश्वर थोरात आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जावेद यांना घाटीत हलविले.
चौकट
कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब वाऱ्यावर
शेख जावेद हे कुटुंबातील कर्ता पुरुष होते. वैजापूर येथे धंदा नसल्याने त्यांचे कुटुंब नाइलाजाने दौलताबाद येथे पोट भरण्यासाठी आले होते. येथेही आसपासच्या खेड्यांमध्ये दुचाकीवर चटाई विक्रीचे काम ते करीत असत. त्यांच्या अपघाती जाण्याने पत्नी, दोन मुले, आई-वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. जावेद यांच्या जाण्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
फोटो आहे. अपघातात मृत्यू झालेले शेख जावेद आपल्या दोन्ही मुलांसोबत.