औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील २ हजार २७९ पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली. जिल्ह्यात ४३५ शाळांमध्ये ५ हजार ३६ जागांवर हे प्रवेश दिले जाणार आहेत.सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्येही समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटक व अपंगांसाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविणे शिक्षण हक्क कायद्यानुसार बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होऊ शकते. असे असले तरी अनेक शाळांनी यातून सुटका करण्यासाठी पळवाटा शोधल्या असाव्यात. पालक जेव्हा आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर जातो, त्यावेळी पहिल्या १ किलोमीटरच्या अंतरावर तसेच पुढील ३ किलोमीटर अंतरावर अपेक्षित शाळाच दिसत नाहीत. अनेकदा ते संकेतस्थळ हँग होते. त्यामुळे पालकांना सायबर कॅफेवर ताटकळत बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. सुरुवातीला या संकेतस्थळावर पालकांसाठी ११ ते २८ मार्चदरम्यान आॅनलाईन नोंदणीची मुदत होती. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांनी नोंदणीच केलेली नसल्यामुळे शाळांसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर संकेतस्थळ सतत हँग होत राहिले. अजूनही पन्नास टक्के पाल्यांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याबाबतच्या हालचालींना शिक्षणाधिकारी कार्यालयात वेग आला आहे. शासन निर्णयानुसार शाळांची सुरुवात ज्या वर्गापासून होते तेथूनच २५ टक्क्यांनुसार प्रवेशस्तर अमलात आणला पाहिजे. शिक्षण विभागाने प्रवेशाचा पॉइंट अगोदर निश्चित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऋषिकेश देशमुख, राहुल तायडे, सम्राट कटारे, अक्षय गोरे, सोनू शहा यांनी शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
‘आरटीई’नुसार प्रवेश प्रक्रिया रेंगाळली
By admin | Published: May 01, 2016 1:26 AM