औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad) सर्व विभागांनी सन १९९७-९८ ते २०१५ या १८ वर्षांत दरवर्षी किती रुपयांची खरेदी करण्यात आली. खरेदीसाठी निविदा अथवा दरपत्रक यापैकी कोणत्या पद्धतीची खरेदी प्रक्रिया राबविली, याबाबतचा अहवाल येत्या तीन दिवसांत सादर करण्याची सूचना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
विद्यापीठातील १२० कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण सध्या सर्वांचीच परीक्षा घेणारे झाले आहे. विधिमंडळाच्या आश्वासन समितीने विद्यापीठातील आर्थिक अनियमिततेचा अहवाल शासनाला सादर केला. त्यानुसार उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल सभागृहात दोषींविरुद्ध येत्या १५ दिवसांत कारवाई करण्याचे संकेत दिले. तत्पूर्वी, दोन दिवसांपूर्वीच १२० कोटींच्या अनियमिततेबाबत विचारणा करणारे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार कुलगुरू डॉ. येवले यांनी शनिवारी विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुख, सर्व अधिष्ठाता, कुलसचिव, प्रकुलगुरू, सर्व उपकुलसचिव, सहायक कुलसचिवांची बैठक घेतली. या बैठकीत कुलगुरूंनी सूचना दिल्या की, येत्या तीन दिवसांत सन १९९७-९८ पासून २०१५ पर्यंत झालेली खरेदी, त्यासाठी वापरण्यात आलेली पद्धत, अग्रीम वेतन प्रदान, संलग्नीकरण शुल्क व त्याचा ताळेबंद याविषयी सविस्तर अहवाल सादर करावा.
दरम्यान, या १८ वर्षांत आतापर्यंत किती विभागप्रमुख बदलले आहेत. अनेक जण सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळातील हिशेब देण्यासाठी आता कागदपत्रांचा धांडोळा घ्यावा लागेल. एवढ्या दिवसांची संबंधित कागदपत्रे आता कुठे शोधावीत, या मानसिकतेतून अनेक विभागप्रमुखांची पाचावर धारण बसली आहे.