लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीत उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदान केंद्राबाहेर बॅनरवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यातून आपल्या उमेदवाराबाबत संपूर्ण माहिती मतदाराला व्हावी, हा यामागचा हेतू राहणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस. सहारिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.सहारिया यांनी बुधवारी नांदेडमध्ये नांदेड-वाघाळा महापालिका आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले, महापालिका निवडणुकीत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र, शपथपत्र आॅनलाईन दाखल करावे लागणार आहेत. या निवडणुकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच केंद्रीय आयकर विभागाचे चार अधिकारी व विक्रीकर विभागाचे अधिकारी आर्थिक बाबीवर नजर ठेवणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी १७ पासून मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची संपूर्ण माहिती ज्यामध्ये मालमत्ताविषयक, दाखल असलेले गुन्हे, झालेली शिक्षा तसेच प्रलंबित असलेले गुन्हे याबाबतच्या माहितीचा समावेश राहणार आहे. मतदान केंद्राबाहेरील बॅनरसमवेत वर्तमानपत्रात जाहिरात देऊनही उमेदवाराबाबतची संपूर्ण माहिती प्रकाशित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.नांदेड महापालिका निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्याचेही ते म्हणाले. यासाठी वोटर स्लीप या बीएलओमार्फत शंभर टक्के मतदानाच्या दोन दिवस आधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. निर्भय आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपायुक्त संतोष कंदेवार, रत्नाकर वाघमारे आदींची उपस्थिती होती.दरम्यान, सहारिया यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणूकसंदर्भात आढावा बैठक घेतली. ग्रामपंचायत तसेच मनपा निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदा मतदान होत आहे. मनपा निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढे मते द्यावी लागणार आहेत. नांदेडमध्ये मतदारांना चार ते पाच उमेदवारांना एकाचवेळी मतदान करायचे आहे. याबाबतही आवश्यक ते जनजागरण करावे.जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी ग्रामपंचायत तर मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका निवडणूक संदर्भातील माहिती दिली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी सुरक्षा विशेष उपाययोजनासंदर्भात माहिती दिली. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी ढालकरी यांनी तर शिनगारे यांनी आभार मानले.
उमेदवारांचा लेखाजोखा आता मतदान केंद्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:43 AM