छत्रपती संभाजीनगर : संगणकाच्या कामांचे ६५ हजारांचे बीलाच्या मंजुरीसाठी ४ हजारांची लाच घेताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचा लेखापाल महेश भालचंद्र चौधरी (५०, रा. गादिया विहार) हा शुक्रवारी रंगेहाथ सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी त्याच्या कार्यालयातच यासाठी सापळा लावला होता.
भोकरदनच्या २५ वर्षीय संगणक व्यवसायिकाकडे जिल्हा, शहरातील अनेक शासकीय कार्यालयातील संगणक दुरूस्तीचे कंत्राटे असतात. त्यातच जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे कामही त्यांच्याकडेच असते. फेब्रुवारी व ऑगस्ट महिन्यात त्यांनी संगणक दुरुस्ती ,नवीन अँटिव्हायरस टाकने, प्रिंटर दुरुस्तीचे कामे केली. फेब्रुवारीचे ५८ हजार ५५६ तर ऑगस्ट महिन्यात ६ हजार ६०० रुपयांचे बीले प्रलंबित होते. व्यवसायिकाने वारंवार चौधरी यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, चौधरी ने पैशांच्या लालसेपोटी बीलांना मंजुरीच दिली नाही. अखेर, ऑक्टोबर महिन्यात चौधरी ने ६५ हजार १५६ रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व ट्रेझरी मध्ये दाखल करण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने त्याची थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदिप आटोळे यांच्याकडे तक्रार केली.
आटोळे यांच्या आदेशावरुन पोलिस उपअधीक्षक संगीता एस. पाटील पोलीस यांनी खातरजमा केली असता चौधरी लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. पाटील यांनी त्यानुसार शुक्रवारी सापळा रचला. तक्रारदाराने चौधरी ला संपर्क केला असता चौधरीने त्याला आवारात थांबण्यास सांगितले. चार वाजता चौधरी ४ हजार रुपये लाच स्विकारताच दबा धरुन बसलेल्या पथकाने त्याला पकडले. हवालदार विलास चव्हाण, दिगंबर पाठक, साईनाथ तोडकर, देवसिंग ठाकूर यांनी ही कारवाई केली. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला सायंकाळी अटक करण्यात आली.