औरंगाबाद : मराठवाड्यातील हवामानाचा अचूक अंदाज येण्यासाठी सी-बॅण्ड डॉपलर रडार बसविण्यासाठी केंद्र शासनाने तयारी सुरू केली असून, २१ मे रोजी केंद्रीय हवामान खात्याचे पथक औरंगाबादेत येणार आहे. म्हैसमाळसह जिल्ह्यातील काही जागांची पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे.
अतिवृष्टी, ढगफुटी, अवर्षणाची माहिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत अचूकरीत्या जावी, यासाठी रडार महत्त्वाचे ठरणार आहे. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय अर्थ व विज्ञान मंत्रालयाने मराठवाड्यासाठी रडार बसविण्यासाठी परवानगी दिली. विभागाच्या कृषी, पर्यटन व उद्योग-दळणवळण विकासाच्या दृष्टीने येथील हवामानाची माहिती मिळण्यास रडारची मदत होणे शक्य होणार आहे.‘लोकमत’ने विशेष वृत्त मालिकेतून रडारचा विषय हाताळत केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या वृत्ताची दखल घेत हवामान खात्याकडून आढावा घेत विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर रडार बसविण्याचा मार्ग मोकळा झाला.
किमान तीनशे ते चारशे किमी अंतर या रडारच्या नियंत्रणात आहे. ३० ते ४० कोटी रुपयांच्या आसपास यासाठी खर्च येणार असून, औरंगाबाद जिल्हा राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणावर असून, येथून मुंबई व नागपूर, कोल्हापूर ते जळगाव, नाशिक, नंदुरबारपर्यंतचे पूर्ण अंतर रडारच्या कक्षेत येणे शक्य होणार आहे.
तीन ते चार महिन्यांत रडार बसेलकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले, २१ मे रोजी केंद्रीय पथक रडार कुठे बसवायचे यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहे. पथकाने जागा निश्चित केल्यानंतर तीन ते चार महिन्यांत रडार बसेल, अशी अपेक्षा आहे.