लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. विशेष म्हणजे एक सहायक फौजदार आणि दोन पोलीस या कैद्यासोबत होते. या तिघांना गुंगारा देण्यात २० वर्षांचा आरोपी यशस्वी झाला. मागील महिन्यात २२ एप्रिलच्या मध्यरात्री घाटीच्या लॉकअपमधून दोन कैदी पिण्याचे पाणी देणाºया पोलिसांवर हल्ला करून पळून गेले होते. यातील एक कैदी अद्यापही सापडलेला नसताना दहा दिवसांत दुसरी घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बेगमपुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलीस शिपाई मोहम्मद अली मोहम्मद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पळून गेलेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. छावणी पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणामध्ये अटक केलेला आरोपी शेख वाहेद शेख असद (२०) याला सिटीचौक पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री आरोपीने तब्येत खराब झाल्याचे सांगितले. कंट्रोलरूमच्या आदेशानुसार शेख वाहेद शेख असद याला सहायक फौजदार शेख इस्माईल, पोलीस शिपाई मोहम्मद अली मोहम्मद शेख आणि पोलीस जमादार अंकुश नामदेव माळी यांनी तपासणीसाठी पोलीस व्हॅनमधून घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटीत डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आरोपीला घेऊन मोहम्मद अली मोहम्मद शेख आणि पोलीस फौजदार शेख इस्माईल हे अपघात विभागासमोर उभ्या पोलीस व्हॅनकडे आले. या व्हॅनचा दरवाजा उघडून आतमध्ये बसवत असताना आरोपींनी मोहम्मद अली यांच्या हाताला झटका देऊन ढकलून दिले. तसेच सहायक फौजदार शेख इस्माईल यांनाही धक्का मारून आरोपी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दिशेन पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता आरोपी काही सापडला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पोलीस मोहम्मद अली यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपी पळून गेल्याची तक्रार दिली. यानुसार आरोपीविरोधात २२४ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पळून गेल्याच्या घटनेला २४ तास उलटले तरी आरोपी सापडलेला नाही.पंधरा दिवसांत ही दुसरी घटनाघाटी रुग्णालयाच्या लॉकअपमध्ये उपचारासाठी ठेवलेला कुख्यात गुन्हेगार सोनू वाघमारे आणि अक्षय आठवले या दोघांनी २२ एप्रिलच्या पहाटे ड्यूटीवरील पोलिसाला पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी घेऊन येताच एका आरोपीने पोलिसाला मारहाण केली व दुसºयाने पोलिसाला लॉकअपमध्ये ढकलून देऊन कोंडून टाकले. यानंतर दोघा आरोपींनी पळ काढला. यातील पळून गेलेला कुख्यात गुन्हेगार सोनू वाघमारे १० दिवस उलटून गेले तरी अद्याप सापडलेला नाही. यानंतर पुन्हा ही घटना घडली.पोलीस महासंचालकांना अहवाल सादरघाटी रुग्णालयातून आरोपी पळून गेल्याची माहिती राज्याच्या पोलीस महासंचालकांना विशेष अहवालाद्वारे पाठविण्यात आलेली आहे. तसेच याप्रकरणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.पहिल्या घटनेतील आरोपी सापडला नाहीघाटीच्या लॉकअपमधून २२ एप्रिलच्या मध्यरात्री पळून गेलेला आरोपी कुख्यात गुन्हेगार सोनू वाघमारे हा अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयाचा आरोपी पळून जाण्याच्या घटनेत कोणताही दोष नसल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.पळालेला आरोपी अट्टल गुन्हेगारघाटीतून पलायन केलेला आरोपी शेख वाहेद हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वीही याच आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. त्यानंतर काही दिवसांनी मदनी चौकातील एका अड्ड्यावर शेख वाहेदला गुन्हे शाखेने पुन्हा अटक केली होती. सुटल्यानंतरही त्याचे चोºया, घरफोड्या करण्याचे सत्र सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आरोपीला नव्हत्या हातकड्याघाटीमध्ये तपासणीसाठी आणलेल्या आरोपीसंदर्भात पुरेशी काळजी घेण्यात आलेली नव्हती. या आरोपीच्या हातात बेड्या घातलेल्या नव्हत्या. केवळ दोरखंडाने बांधलेले होते. त्यामुळे आरोपी संधी मिळताच हाताला झटका देऊन पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.